बेळगाव लाईव्ह : बेळगावातील बसवराज वस्त्रद कुटुंबीय गेल्या 50 वर्षांपासून मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ बनवण्याचा व्यवसाय करत आहेत. स्वच्छता, दर्जा आणि चव यांच्या अनुषंगाने त्यांनी आपला व्यवसाय ग्रामीण आणि शहरी भागात नावारूपाला आणला आहे.
भारतीय परंपरेतील पहिला सण मकर संक्रांती सण “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” या संदेशाने प्रेम आणि आपुलकी पसरवणारा सण आहे. या सणासाठी लागणारा तिळगुळ बेळगावातील काही निवडक व्यवसायिकांकडून बनवला जातो. यामध्ये बसवराज वस्त्रद कुटुंबीयांचा उल्लेख प्रामुख्याने होतो, जे गेल्या 50 वर्षांपासून दर्जेदार तिळगुळ बनवून ग्राहकांचा विश्वास जिंकत आहेत.
बसवराज वस्त्रद यांनी “बेळगाव लाईव्ह”शी संवाद साधताना सांगितले की, सुरुवातीला त्यांच्या वडिलांनी तिळगुळ बनवण्याचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र, वडिलांच्या आजारपणानंतर मागील 17 वर्षांपासून त्यांनी हा व्यवसाय सांभाळला आहे. तिळगुळ बनवताना स्वच्छता राखण्यावर ते विशेष भर देतात. त्यांच्या मते, कोणतीही भेसळ न करता शुभ्र साखर आणि शुद्ध पाण्याचा वापर करूनच तिळगुळ तयार केले जातात.
मागील 20 वर्षांपासून त्यांनी मशीनींच्या सहाय्याने तिळगुळ तयार करण्यास सुरुवात केली आहे. एका तासात 400-500 किलो तिळगुळ तयार करणाऱ्या या मशीन्समुळे त्यांच्या उत्पादनाला गती मिळाली आहे. संक्रांतीचा हंगाम संपल्यानंतर जत्रा, उत्सवांसाठी बत्ताशे, बेंड यासारख्या वस्तू देखील तयार केल्या जातात.
वस्त्रद कुटुंबीय तयार करत असलेल्या तिळगुळांना बेळगावसह खानापूर, बैलहोंगल, चिक्कोडी, गोकाक, अथणी आणि गोवा या ठिकाणी मोठी मागणी असते. तिळगुळांमध्ये साधा तिळगुळ, शेंगदाण्याचा तिळगुळ आणि बडीशेप तिळगुळ तयार होतात. यामध्ये बडीशेप तिळगुळाची मागणी तुलनेने कमी असते, असे बसवराज वस्त्रद यांनी सांगितले.
गेल्या 50 वर्षांपासून संक्रांतीच्या गोडव्याला आकार देत असलेल्या या व्यवसायाने वस्त्रद कुटुंबीयांना वेगळी ओळख मिळवून दिली आहे.