बेळगाव लाईव्ह :समाजाभिमुख उपक्रम राबविणाऱ्या रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईट या संघटनेने आर. एम. आसोसिएटस व वननेस बिलियर्डस् अॅन्ड डेव्हलपर्स या फर्मचे मालक अभियंता आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर. एम. चौगुले यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा व आर्थिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत या वर्षीचा ‘उत्तम व्यावसायिक अभियंता’ हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
शहरातील आदर्श पॅलेस सभागृहात नुकत्याच संपन्न झालेल्या दिमाखदार पुरस्कार वितरण समारंभात रोटरी क्लब इलाईट बेळगावचे अध्यक्ष रो. सचिन हंगीरकर, सचिव रो. विशाल मुरकुंबी व उच्च पदाधिकारी सौ. पुष्पा पर्वतीराव हे उपस्थितीत अभियंता चौगुले यांना उपरोक्त पुरस्कार बहाल करण्यात आला. पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सदर पुरस्कारामुळे जनतेची सेवा पुन्हा मोठ्या तडफेने करण्याचा मानस अभियंता आर. एम. चौगुले यांनी व्यक्त केला.
कोणताही व्यवसाय करताना प्रामाणिकपणा व पारदर्शकपणा जपला तर तो व्यवसाय अधिक वृद्धिंगत होतो. हा सर्वसामान्य अनुभव आहे. याच व्यावसायिकतेच्या जोडीला समाज सेवेची किनार लाभली तर तो व्यवसाय समाजाभिमुख होतो आणि ही सामाजिक जाणीव अनेकांच्या आधाराचे केंद्र बनते.
अभियंता आर. एम. चौगुले यांनी आजवर आपल्या व्यवसायात अनेक मानांकनं प्राप्त केली आहेत. गेली दोन दशके ते गरजूबरोबरच धनदांडग्यांना अलिशान घरकुल बांधून देत आले आहेत. आपल्या ‘आर. एम. आसोसिएटस व वननेस बिलियर्डस् अॅन्ड डेव्हलपर्स’ या फर्मच्या माध्यमातून त्यांनी घरकुल, हाॅस्पिटल, हाॅटेल्स, कल्यान मंटप या सारखे मोठ मोठे प्रकल्प उभे केले आहेत.
हे करत असताना त्यांनी नेहमीच समाजिक भान ठेवला आहे. म्हणूनच गोरगरीब विद्यार्थी वा सर्वसामान्य जनता असेल त्यांना मदतीचा न दिसणारा सढळ हात पुढे केला आहे.
आजवर आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या अनेक रूग्णांना व आर्थिक विवंचनेत असणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना मदत करून चौगुले यांनी त्यांना मोठा दिलासा तर दिला आहेच, शिवाय मोठा आर्थिक भार ही उचलला आहे. अभियंता आर. एम. चौगुले फक्त अर्थ सहाय्य देवून न थांबता आपल्या व्यस्त कामातून थोडा वेळ काढून तो गरजवंता सोबत घालवतात.
एकंदर समाजाच्या उद्धारासाठी राजकीय क्षेत्रासह शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, सामाजिक आणि आर्थिक संस्थांमधून आर. एम. चौगुले यांनी केलेल्या कार्याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईटने त्यांना यंदाच्या आपल्या ‘उत्तम व्यावसायिक अभियंता’ पुरस्काराने गौरविले आहे. अभियंता आर. एम. चौगुले यांच्या सोबतीला नेहमीच त्याग, सेवा आणि समर्पण या तीन गोष्टी असतात. म्हणूनच आज बेळगाव शहर आणि तालुका त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहतो आहे.