बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील फेसबुक फ्रेंड्स सर्कल या सेवाभावी संघटनेतर्फे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी आयोजित भव्य रांगोळी स्पर्धा आज शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडली.
कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या आवारामध्ये आयोजित या स्पर्धेत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मराठी इंग्रजी आणि उर्दू माध्यम शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला होता. सदर स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथी पाचवी ते सातवी आणि आठवी ते नववी अशा तीन गटात घेण्यात आली.
ज्यामध्ये प्रत्येकी तीन स्पर्धकांचा समावेश असलेल्या एकूण 23 संचानी भाग घेतला होता. याखेरीज एकट्याने रांगोळी काढायच्या स्पर्धेत 38 स्पर्धकांनी भाग घेतला होता. विशेष म्हणजे यंदा प्रथमच कॅन्टोन्मेंटच्या उर्दू माध्यम शाळेने या स्पर्धेत सहभाग दर्शवला होता.
सदर रांगोळी स्पर्धेसाठी एंजल फाउंडेशनच्या अध्यक्षा मीना अनिल बेनके आणि त्यांच्या चार सहकारी महिलांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेचा निकाल उद्या रविवारी 26 जानेवारी रोजी जाहीर केला जाऊन बक्षिसे दिली जाणार आहेत.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे अध्यक्ष संतोष दरेकर, मंजुनाथ आदींनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या तीनही शाळांच्या मुख्याध्यापक तसेच शिक्षक व कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभले.
स्पर्धेच्या ठिकाणी बेळगाव लाईव्हशी बोलताना स्पर्धेच्या मुख्य परीक्षक मीना अनिल बेनके यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मराठी इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थी -विद्यार्थिनींसाठी विविध गटात घेण्यात आले सदर रांगोळी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल प्रशंसोद्गार काढले. विशेष करून या स्पर्धेत उर्दू माध्यमांच्या विद्यार्थिनींनी उस्फुर्त सहभाग दर्शवल्याबद्दल बेनके यांनी आनंद व्यक्त केला.
त्या म्हणाले की, आम्ही हिंदू धर्मीय रीतीरिवाजानुसार आपल्या घरासमोर दररोज सकाळी रांगोळी घालतो त्यामुळे आमच्या मुलींसाठी रांगोळी ही बाब विशेष नसते त्यामुळे उर्दू भाषिक मुस्लिम धर्मीय मुलींनी रांगोळी घालणे ही खरोखर कौतुकाची आदर्शवत गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या या शाळांमध्ये श्रीमंत घरातील मुले नाहीत, येथे शिकणारी मुले ही बहुतांश गरीब व मध्यमवर्गीय घरातील आहेत त्यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सामाजिक संघ -संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे.
एंजल फाउंडेशनतर्फे आम्ही कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळेला विविध जातीच्या झाडांची 70 रोपे आणि कुंड्या भेटी दाखल दिल्या आहेत. मुलांना वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धन पर्यावरणाचे महत्त्व कळावे हा यामागचा उद्देश आहे. झाडाची रोपे व कुंड्या देण्याचा हा उपक्रम आम्ही आज या शाळेपासून सुरू करत असून सरकारी शाळांमध्ये देखील सदर उपक्रम राबवणार आहोत, अशी माहिती मीना बेनके यांनी दिली.