बेळगाव लाईव्ह :कोट्यावधी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आलेल्या बेळगाव रेल्वे स्थानकातील फूटब्रिज बंद ठेवण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून ते धोकादायकरित्या रेल्वेमार्ग ओलांडत आहेत. त्याची गांभीर्याने दखल घेऊन बंद असलेला फुटब्रीज युद्धपातळीवर दुरुस्त करून तात्काळ जनतेसाठी खुला करावा अशी जाहीर विनंती सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे यांनी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांना केली आहे.
नूतनीकरण करण्यात आलेल्या बेळगाव रेल्वे स्थानकातील फुटब्रिज दुरुस्तीचे कारण पुढे करून गेल्या दीड -दोन महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला आहे. प्रवाशांसाठी असणारी लिफ्टची व्यवस्था देखील बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय आणि कुचंबना होत आहे. फूटब्रिज बंद असल्यामुळे रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या प्लॅटफॉर्म क्र. 1 पासून पलीकडच्या बाजूस असलेल्या 2 व 3 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी किंवा तेथून परत 1 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी प्रवाशांना मोठी यातायात करावी लागते.
बॅगा वगैरे आपल्या प्रवासाच्या साहित्याचे ओझे सांभाळत धावाधाव करून त्यांना एकतर प्लॅटफॉर्मच्या उजव्या किंवा डाव्या बाजूच्या टोकापर्यंत चालत 200 -300 मी. अंतराचा भोवाडा घालून रेल्वे मार्ग ओलांडत, अथवा प्लॅटफॉर्मवरून खाली रेल्वे मार्गावर उतरून तो धोकादायकरित्या ओलांडत पलीकडचा प्लॅटफॉर्म गाठावा लागत आहे.
या सर्व प्रकारामुळे मोठा मनस्ताप होत असल्यामुळे फुटब्रीज लवकरात लवकर खुला करावा अशी प्रवाशांची सततची मागणी आहे. मात्र दुर्दैवाने रेल्वे प्रशासनाने अद्यापही त्याची दखल घेतलेली नाही.
बेंगलोर येथून रेल्वेने पुन्हा बेळगावला परतलेल्या माजी महापौर विजय मोरे यांना देखील उपरोक्त गैरसोयीचा सामना करावा लागला. त्यावेळी त्यांनी त्याच ठिकाणी प्लॅटफॉर्मवर थांबून फुटब्रिज अभावी होणारे प्रवाशांचे हाल व्हिडिओ चित्रीकरणाच्या माध्यमातून टिपले.
तसेच त्याबद्दलची माहिती देऊन प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी बेळगाव रेल्वे स्थानकावरील फुटब्रिज युद्धपातळीवर दुरुस्त करून खुला करावा अशी जाहीर विनंती त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांना केली आहे.