बेळगाव लाईव्ह : नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय विद्यालय बॅगपाईप बँड स्पर्धेत दक्षिण विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निघालेल्या बेळगावच्या केंद्रीय विद्यालय क्र. 2 च्या वाद्यवृंद पथकातील विद्यार्थ्यांचे खुद्द काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियांका गांधी यांनी मुक्तकंठाने कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
काँग्रेसचा ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ मेळावा संपवून पुन्हा नवी दिल्लीला जाण्यासाठी बेळगाव विमानतळावर पोहोचलेल्या खासदार प्रियांका गांधी यांची काल मंगळवारी योगायोगाने दिल्लीलाच जाणाऱ्या केंद्रीय विद्यालय क्र. 2 बेळगावच्या वाद्यवृंद पथकातील विद्यार्थ्यांशी पडलेली गाठ साऱ्यांचे लक्ष वेधणारी ठरली.
आपल्या सुरक्षा कवचातून बाहेर पडून खासदार प्रियांका गांधी यांनी राष्ट्रीय पातळीवरील बॅगपाईप वाद्यवृंद (बँड) स्पर्धेत भाग घेण्यास निघालेल्या त्या विद्यार्थ्यांची मुक्तपणे भेट घेतली. तसेच मोठ्या आत्मीयतेने चौकशी करून त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्यासोबत छायाचित्रे देखील काढून घेत आपले प्रेम व्यक्त केले. ही घटना विमानतळावर उपस्थित साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील केंद्रीय विद्यालय क्र. 2 (के.व्ही. -2) शाळेच्या बॅगपाईप बँड अर्थात वाद्यवृंदाने अलीकडे झालेल्या राज्यस्तरीय वाद्यवृंद स्पर्धेत प्रथम क्रमांक तर दक्षिण विभागीय पातळीवरील स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
त्यामुळे सदर वाद्यवृंदाला येत्या शुक्रवार दि. 24 व शनिवार दि. 25 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडांगणावर होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय विद्यालय बॅगपाईप बँड स्पर्धेत दक्षिण विभागाचे प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे. हे यश विद्यालयासाठी आणि बेळगाव शहरासाठी अभिमानास्पद आहे. या यशाबरोबरच विशेष गोष्ट ही की संबंधित विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमान प्रवासाचा उत्साहवर्धक आनंददायी प्रवास करण्याची संधी प्राप्त झाली आहे. अशातच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची भेट आणि त्यांनी दिलेली कौतुकाची थाप विशेष लक्षवेधी ठरली आहे.
केंद्रीय विद्यालय क्र. 2 बेळगाव या शाळेच्या बॅगपाईप बँड अर्थात वाद्यवृंदाला केंद्रीय विद्यालय संघटना विभागीय कार्यालय बेंगलोर आणि मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव यांच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आहे. सदर वाद्यवृंदाला केंद्रीय विद्यालय क्र. 2 बेळगावचे प्राचार्य महेंद्र कालरा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
आमच्या विद्यालयाच्या वाद्यवृंदाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणे हा बेळगाव परिसरासाठी अभिमानाचा क्षण असून आमच्या विद्यार्थ्यांच्या परिश्रम आणि समर्पणासह मार्गदर्शकांच्या सहकार्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे असे सांगून प्राचार्य कालरा यांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शाळेच्या बॅगपाईप बँड अर्थात वाद्यवृंदातील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.