Sunday, January 5, 2025

/

राष्ट्रपतींनी केलं बेळगावात कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा वेगाने प्रसार होत असल्याने त्यावर सामूहिकपणे उपाययोजना करण्याची गरज आहे. केएलई संस्थेने समाजाच्या हितासाठी कॅन्सर रुग्णालय सुरू करून आरोग्यसेवेत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. त्यांनी शुक्रवारी (दि. 3) केएलई डॉ. संपतकुमार शिवणगी कॅन्सर रुग्णालयाचे उद्घाटन केले.

या प्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, राज्याचे मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार जगदीश शेट्टर, आमदार व केएलई अध्यक्ष महांतेश कौजलगी आणि कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे उपस्थित होते.

राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात केएलई संस्थेने सुरू केलेल्या रुग्णालयाबद्दल समाधान व्यक्त केले. एका छताखाली सर्व अत्याधुनिक उपचार सुविधा मिळाल्यामुळे गरजू रुग्णांना कमी खर्चात आणि प्रभावी उपचार मिळतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की कॅन्सर हा आजार फक्त रुग्णाला नाही तर संपूर्ण कुटुंबाला प्रभावित करतो. त्यामुळे वैद्यकीय सेवा ही केवळ उपचार देणारी नसून मानसिक आधार देणारीही असली पाहिजे. केंद्र सरकारच्या आरोग्य भारत योजनेमुळे कमी उत्पन्न गटातील लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळत आहेत.

या वेळी बोलताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बदललेल्या जीवनशैलीमुळे कॅन्सरची प्रकरणे वाढत असल्याचे नमूद केले. योग्य वेळी निदान झाल्यास कॅन्सरवर उपचार होऊ शकतात, असे सांगत त्यांनी केएलई संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. देश सशक्त आणि निरोगी राहण्याच्या दृष्टीने अशा प्रकारच्या प्रकल्पांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.Kle

कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी केएलईच्या स्थापनेपासूनचा इतिहास उलगडून दाखवला. अत्यंत कठीण परिस्थितीत सप्तर्षींनी स्थापन केलेल्या या संस्थेने शिक्षण व आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. बेळगाव व हुबळी येथे दोन विद्यापीठे कार्यरत असून चार हजाराहून अधिक खाटांचे अद्ययावत रुग्णालय चालवले जात आहे. मात्र कॅन्सर रुग्णांना उपचारासाठी मुंबई किंवा अन्य मोठ्या शहरांमध्ये जावे लागत असल्याने अशा रुग्णांची सोय व्हावी या उद्देशाने बेळगावातच कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

अथणी येथील मूळचे रहिवासी व अमेरिकेत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. संपतकुमार शिवणगी यांनी या प्रकल्पासाठी आठ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या योगदानाची दखल घेऊन रुग्णालयाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. 300 खाटांचे हे रुग्णालय अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असून येथे रोबोटिक शस्त्रक्रियांसाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. कर्नाटकासह महाराष्ट्र, गोवा व तेलंगणा या राज्यांतील रुग्णांना या रुग्णालयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपतींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार व आरोग्य क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.