बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्यातील राखीव जंगलात पोलीस कर्मचाऱ्यांच्या एका गटाने दारूची रंगीत पार्टी केल्याची वादग्रस्त घटना उघडकीस आली आहे. व्हिडिओमध्ये कैद झालेली ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. वनाधिकाऱ्यांनी अनधिकृत प्रवेशाची पुष्टी केली असून दंडात्मक कारवाईसाठी सहभागी पोलीस अधिकारी -कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
खानापूर (जि. बेळगाव) तालुक्यातील राखीव जंगलात पोलीस कर्मचाऱ्यांच्या टोळक्याने दारूची पार्टी केल्याने वादाला तोंड फुटले आहे. या घटनेचा व्हिडीओ पार्टी करणाऱ्यांपैकीच एकाने शूट केला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केला असून आता तो व्हायरल होत आहे.
एका आठवड्यापासून चर्चेत असलेल्या या व्हिडिओमध्ये सुमारे 12 ते 15 पोलिस कर्मचारी परवानगीशिवाय संवेदनशील वनक्षेत्रात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यांनी आग लावून अन्न शिजवून दारू पार्टी केल्याचे तसेच ते जंगलात फिरत असल्याची आणि पाण्यात पोहत असल्याची दृश्ये व्हिडिओ पहावयास मिळतात. वन्यप्राण्यांना त्रास देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या या असंवेदनशील कृतीमुळे संतापाची लाट उसळली आहे. पत्रकारांशी बोलताना उप वनसंरक्षणाधिकारी (डीसीएफ) मारिया ख्रिस्तू राजा डी यांनी पोलिसांच्या जंगलातील पार्टीच्या माहितीची पुष्टी केली आहे.
लोंढा रेंजमधील राखीव जंगलात खानापूर तालुक्यातील कांही पोलिस कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे प्रवेश केला हे खरे आहे. आम्ही पोलिस विभागाला या घटनेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख पडताळून पाहण्यास सांगितले आहे. आम्हाला माहिती मिळाल्यावर आवश्यक दंडात्मक कारवाई सुरू केली जाईल, असे अधिकारी मारिया म्हणाल्या. तथापि त्यांनी एक संवेदनशील आणि संरक्षित जंगल जेथे बाहेरील लोकांना प्रवेश प्रतिबंधित आहे अशा भीमगड वन्यजीव अभयारण्यात पोलीस कर्मचारी प्रवेश केल्याचा दावा नाकारला. दुसरीकडे अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये कर्मचाऱ्यांनी ते भीमगड वन्यजीव अभयारण्य असल्याचा दावा केला आहे.
प्रतिबंधित जंगलातील पोलिसांच्या पार्टीबद्दल विचारणा केली असता जिल्हा पोलीस अधीक्षक (एसपी) भीमाशंकर गुळेद यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मला हे आठवडाभरापूर्वीच कळाले. त्यांनी राखीव जंगलाला भेट दिली हे खरे असले तरी आरक्षित वनक्षेत्रात त्यांनी दारू पार्टी केली नाही किंवा अन्न शिजवले नाही तर ते सर्व त्यांनी आरक्षित क्षेत्राबाहेर केले आहे, असे स्पष्टीकरण एसपींनी दिले.
भीमगड वन्यजीव अभयारण्यातील जैवविविधता, दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी यांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने वन विभागाने वज्रपोहा धबधब्याच्या ठिकाणी प्रवेशास बंदी केली आहे. मात्र वज्रपोहा धबधब्याला भेट देण्यासाठी अतिउत्साही लोक बेकायदा अभयारण्यात घुसतात. पोलिस कर्मचाऱ्यांच्या व्हिडिओशिवाय वज्रपोहा धबधब्यांना अवैध भेट देण्याचे अनेक जुने व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत. जुन्या व्हिडिओं संदर्भात बोलताना, डीसीएफ मारिया क्रिस्तू राजा डी यांनी सांगितले की, आम्ही या गुन्ह्यांची दखल घेतली आहे. वज्रपोहा धबधब्याच्या ठिकाणी बेकायदेशीर प्रवेश आणि तेथील वन्यप्राण्यांचा त्रास देण्याबाबत आम्ही तपास करत आहोत, दोषींची ओळख पटताच त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल. त्या व्हिडीओंचा स्रोत शोधण्यासाठी आणि संबंधित व्यक्तींची ओळख पटण्यासाठी आम्ही सायबर सेलशी संपर्कात आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.