बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहरातील उद्यमबाग पोलीस ठाण्यात एका हवालदाराने कर्तव्यात बदल केल्याच्या कारणावरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची नाट्यमय घटना उघडकीस आली आहे.
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस हवालदाराचे नांव मुदकप्पा उदगट्टी असे आहे. ड्युटीमध्ये अर्थात कर्तव्यात बदल केल्याच्या कारणावरून त्याने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की दोन दिवसांच्या रजेवरून परतलेल्या मुदकप्पा यांना वरिष्ठांकडून नव्या पदावर नियुक्त करण्यात आले. यावरून पोलीस निरीक्षक व मुदकप्पा यांच्यात वादावादी होऊन संतापाच्या भरात मुदकप्पा याने विष पिऊन जीव देण्याची धमकी दिली.
सदर प्रकारामुळे उद्यमबाग पोलीस ठाण्यात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान संतापाच्या भरात रक्तदाब कमी झाल्यामुळे मुदकप्पा चक्कर येऊन खाली कोसळला.
तेंव्हा त्याला तातडीने येळ्ळूरजवळील एका खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागले. या गोंधळाची माहिती मिळताच खडेबाजारचे एसीपी शंकरप्पा यांनी कर्मचाऱ्यांकडून तपशील गोळा करण्यासाठी उद्यमबाग पोलिस स्टेशनला भेट दिली. पोलिस आयुक्त याडा मार्टिन यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली.