बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील सीपीएड मैदानावर काँग्रेस पक्षाच्या काल मंगळवारी पार पडलेल्या ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ मेळाव्याच्या समारोपानंतर कार्यक्रम स्थळावरून तब्बल 2.5 प्लास्टिक बाटल्या जमा करण्यात आल्या.
मनपा आरोग्य विभागाच्या माहितीनुसार जमा झालेल्या प्लास्टिक बाटल्यांच्या विक्रीतून कचरा वेचकांना सुमारे 10,000 रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
काँग्रेस पक्षाचे ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ मेळावा काल सीपीएड मैदानावर पार पडला. या मेळाव्यास राज्यभरातून सुमारे दीड ते दोन लाख काँग्रेस कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. मेळाव्या संपल्यानंतर लगेचच गणेशपुर येथील 6 कचरा वेचकांनी कार्यक्रम स्थळावरून तब्बल 2.5 टन प्लास्टिक बाटल्या जमा केल्या.
या माध्यमातून त्या सहा कचरावेचकांना सुमारे 10,000 रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. अवघ्या 2 तासात कचरा वेचकांनी हे उत्पन्न मिळवल्याबद्दल महापालिकेचे सहाय्यक कार्यकारी अभियंते हनुमंत कलादगी व पर्यावरण अभियंते आदिल खान यांनी सीपीएड मैदानावर काल त्यांचे अभिनंदनही केले.
याआधी 2023 मध्ये राज्योत्सव मिरवणुकीनंतर अशाच पद्धतीने प्लास्टिक बाटल्या व अन्य साहित्याची उचल करून परिसर स्वच्छ करण्याबरोबरच कचरा वेचकांनी तब्बल 20,000 रुपये कमावले होते. त्याचीच पुनरावृत्ती काल सीपीएड मैदानावर झाल्याचे पहावयास मिळाले. प्लास्टिक बाटल्यांचे संकलन झाल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सीपीएड मैदानाची तातडीने स्वच्छता करण्यात आली. काल रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.