बेळगाव लाईव्ह : 14 जानेवारी रोजी कुडलसंगम येथील पंचमसाली पीठामध्ये प्रतिज्ञा क्रांती आयोजित केली जाणार आहे. आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा 8वा टप्पा यावेळी सुरू होणार असून, समाजावरील अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा निर्धार करण्यात आला आहे, अशी माहिती कुडलसंगम पिठाचे श्री बसवजय मृत्युंजय स्वामी यांनी आज बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
कुडलसंगम पंचमसाली पीठाचे प्रमुख श्री बसव जयमृत्युंजय स्वामीजी यांनी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, समाजाच्या आरक्षणासाठी आणि झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी 14 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता विशेष प्रतिज्ञा क्रांती करण्यात येईल.
अधिवेशनादरम्यान झालेल्या लाठीचार्जमुळे पंचमसाली समाजाला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर, प्रत्येक गावात प्रतिज्ञा क्रांतीद्वारे समाजाला मनोबल देण्यात येणार आहे. आंदोलनाची ही पुढील दिशा पंचमसाली समाजाच्या हक्कांसाठी निर्णायक ठरेल.
कार्यक्रमाचा उद्देश केवळ समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सोडवणे नसून, समाजाच्या एकतेचे प्रदर्शन करणे आणि लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्यांना आधार देणे हा आहे असे स्वामीजी म्हणाले.
कार्यक्रमासाठी पंचमसाली समाजाचे विविध नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये आर. सी. पाटील, चिदानंद जकाती, सिद्दू सवदी, राजू मगतुम यांच्यासह अनेक मान्यवरांचा सहभाग असेल. समाजाच्या हक्कासाठी हा लढा अधिक व्यापक होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.