बेळगाव लाईव्ह : देशप्रेमाची ओढ, सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर बेळगावमधील निलजी या गावातील सिद्धार्थ नारायण पाटील या युवकाने आसाम रायफल्समध्ये ज्युनियर कमिशन ऑफिसरपदी आपली वर्णी लावली आहे.
सुरुवातीला तो जी डी म्हणून भर्ती झाला प्रशिक्षण संपून जीडी म्हणून केवळ तीन महिने सेवा बजावली मात्र त्याआधीच दिलेला परीक्षेत अव्वल ठरला आणि आसाम रायफल्स मध्ये ज्युनियर कमिशन अधिकारी बनला. त्याने दहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करून आज अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे अशा बेळगाव तालुक्यातील मराठी माध्यमातून शिकून यश मिळवलेल्या सिद्धार्थ विषयी…
बेळगाव तालुक्यातील पूर्व भागातील निलजी येथील सरकारी शाळेत शालेय शिक्षण, मराठी विद्या निकेतन शाळेत हायस्कूल आणि दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती महाविद्यालयातून पदवीपूर्व शिक्षण आणि त्यानंतर विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीयरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या सिद्धार्थ नारायण पाटील यांनी महाविद्यालयीन स्तरापासूनच सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न पाहिले होते.
आपले शिक्षण पूर्ण करत, पेंटिंग काम यासह अनेक छंद जोपासत, विविध स्तरांवरील उपक्रमात सहभाग घेत, प्रत्येक टप्प्यावर यश मिळवत अखेर सैन्यदलात भरती होऊन देशसेवेचे व्रत स्वीकारले आहे.देशासाठी काम करण्याची इच्छा बाळगणाऱ्या सिद्धार्थ पाटील या युवकाने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तब्बल ४५०० उमेदवारांतून आपली वर्णी या पदावर लावली आहे.
यासंदर्भात बोलताना सिद्धार्थ पाटील यांचे वडील नारायण पाटील यांनी बेळगाव लाईव्ह ला माहिती देताना सांगितले, लहानपणापासूनच अभ्यासू, मेहनती आणि प्रचंड जिद्दीतून आपला मुलगा मोठा झाला. सैन्यदलात भरती होण्यासाठी त्याने मुतगा येथील प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेतले. सैन्यदलात भरती होण्याची स्वप्ने बाळगून त्यचदिशेने तयारी करणाऱ्या आपल्या मुलाने थेट भरतीचे पत्र आल्यानंतरच आपल्याला कळविले.
दहावी झाल्यानंतर आसाम रायफलमध्ये त्याने प्रशिक्षणार्थी म्हणून कामकाजाला सुरुवात केली. ३ महिने तेथील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रशिक्षणाच्या दिशेने तयारी सुरु ठेवली. यशाच्या या शिखरावर पोहोचण्यासाठी अपार मेहनत घेत ज्युनियर ऑफिसर पदावर पोहोचण्यासाठी १० महिन्यांचे कठोर प्रशिक्षण घेतले. गुवाहाटी मधून आसाम मध्ये बदली झाली.
आज त्याने आपले प्रशिक्षण पूर्ण केले असून ज्युनियर कमिशन ऑफिसर म्हणून तो शपथबद्ध झाला आहे. आपल्या मुलाने कमाविलेल्या या यशाचा पालक म्हणून आपल्याला अभिमान आहे, शिवाय निलजी गावासाठीदेखील हि अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले.
येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या परेडमध्ये सिद्धार्थ पाटील सहभागी होणार असून सिद्धार्थच्या यशामुळे बेळगावकरांच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे.