Saturday, January 11, 2025

/

इमारतीवरून खाली पडलेल्या दोघा भावंडांपैकी 1 ठार, दुसरा गंभीर

 belgaum

बेळगाव लाईव्ह :गांजा ओढण्यावरून दोघा भावंडांमध्ये झालेल्या हाणामारीचे पर्यवसान दोघेही भाऊ तोल जाऊन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळल्याने घडलेल्या दुर्घटनेत एक जण जागीच ठार तर दुसरा दोन्ही पाय तुटून गंभीर जखमी झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील निलजी गावामध्ये काल शुक्रवारी रात्री उशिरा घडली.

सदर भावंडांपैकी जागीच मृत्युमुखी पडलेल्याचे नांव सुशांत सुभाष पाटील (वय 20, रा. निलजी) असे असून त्याचा मोठा भाऊ ओंकार सुभाष पाटील (वय 23, रा. निलजी) हा गंभीर जखमी झाला आहे.

त्याला उपचारासाठी बेळगाव येथील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, सुशांत व ओंकार या दोघांना गांजाचे व्यसन जडले होते. व्यसनाधीन झालेले हे दोघे घरातील कामांकडे लक्ष देत नसल्यामुळे पालकांकडून सतत ओरडा खात. काल शुक्रवारी रात्री देखील घरातील कामे करत नसल्याबद्दल पालकांनी दोघांनाही चांगलाच दम दिला.

त्यानंतर घरातली कामे कोण करणार? यावरून वाद घालत सुशांत व ओंकार हे दोघेही इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या जिन्यावर गांजा ओढण्यासाठी गेले. त्या ठिकाणी गांजा ओढण्यावरून दोघांमध्ये झालेल्या वादावादीचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यावेळी गांजाच्या नशेमध्ये सुशांत व ओंकार इतके बेभान झाले की तोल जाऊन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली कोसळले. या दुर्घटनेत सुशांत पाटील हा रक्ताच्या थारोळ्यात जागीच गतप्राण झाला, तर ओंकार पाटील याचे दोन्ही पाय तुटल्याने तो गंभीर जखमी झाला.

सदर घटनेची माहिती मिळताच मारीहाळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या ओंकार पाटील याला अधिक उपचारासाठी बेळगावच्या खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या पद्धतीने गांजाच्या व्यसनाने गावातील दोघा तरण्याबांड युवकांपैकी एकाचा जीव घेतला, तर दुसऱ्याला आजन्म अपंग केल्याबद्दल गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, निलजी गावातील तरुणांना गांजासारखे अंमली पदार्थ कुठून उपलब्ध होतात? याचा छडा लावला जावा. तसेच पोलीस खात्याने बेळगाव शहर परिसरातील अंमली पदार्थ विक्रीला तात्काळ आळा घालावा, अशी जोरदार मागणी श्रीराम सेना हिंदुस्थानचे बेळगाव तालुका अध्यक्ष भरत पाटील यांनी केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.