बेळगाव लाईव्ह : भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश असून, सुदृढ राष्ट्रनिर्मितीसाठी युवकांची भूमिका महत्त्वाची आहे. मतदान करताना कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता, जाती-धर्म विसरून आपला मतदानाचा अधिकार बजावणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश टी. एन. इनवळ्ळी यांनी केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या वतीने कुमार गंधर्व रंगमंदिरात आज आयोजित १५व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
मतदान हा संविधानाने दिलेला मौल्यवान अधिकार आहे. या अधिकाराचा योग्य उपयोग करणे हे प्रत्येक पात्र नागरिकाचे कर्तव्य आहे, असे त्यांनी नमूद केले. मतदानाद्वारे योग्य आणि प्रामाणिक उमेदवारांची निवड करणे हे मतदारांच्या हाती आहे. प्रामाणिकपणे मतदान करणे आणि इतरांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करणे हे आपल्या सामाजिक जबाबदारीचे महत्त्वाचे अंग आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
मतदान हा केवळ मूलभूत अधिकार नाही, तर ती मोठी जबाबदारी आहे. आपल्या मतांद्वारे सक्षम आणि विकासाभिमुख नेत्यांची निवड करणे ही मतदारांची जबाबदारी आहे. युवकांची ताकद देशाचे भवितव्य बदलू शकते. ही ताकद योग्य मार्गाने वापरली, तर देश सुदृढ राष्ट्र बनू शकतो, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.
तसेच “वोट तुम्हारा शक्ती बड़ी, इसे ना व्यर्थ गवाना, देश की तकदीर है इसमें, अपने तकदीर बदलना, एक-एक वोट से बनती बदलाव की तस्वीर, सोच-समझकर चुनो नेता, ये है लोकतंत्र की…” अशी शायरी सादर करून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मतदानाचे महत्त्व विशद केले.
या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महापालिका आयुक्त शुभा बी., वरिष्ठ अधिकारी गीता कौलगी, जिल्हा पंचायत योजना संचालक रवी बंगारप्पनवर, महापालिका उपआयुक्त उदयकुमार तळावार, रेश्मा ताळिकोटी, पदवीपूर्व शिक्षण उपसंचालक कांबळे आणि विविध विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान नव्या मतदान ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. मतदार नोंदणी चांगल्या प्रकारे पार पाडणाऱ्या बीएलओंना तसेच विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ‘ना भारत’ हा लघुपट सादर करण्यात आला.
उपस्थितांनी मतदार दिनाची शपथ घेत मतदानाचा संकल्प केला. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून सुरुवात होऊन रॅली चन्नम्मा सर्कल, बीम्स रुग्णालय मार्गे कुमार गंधर्व रंगमंदिर येथे समाप्त झाली.