Saturday, January 4, 2025

/

‘त्या’ नाल्याचे बांधकाम तात्काळ थांबवण्याचा पालक मंत्र्यांचा आदेश

 belgaum

बेळगाव लाईव्ह :आनंदनगर, वडगाव दुसरा क्रॉस येथील नाल्याचे बांधकाम खाजगी जागांमधून का केले जात आहे? असा जाब अधिकाऱ्यांना विचारून राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी सदर नाला पूर्वीपासून अस्तित्वातच नसेल तर तो निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. नाल्याचे बांधकाम तात्काळ थांबवा, असा आदेश आज बुधवारी दुपारी दिला.

अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाची पाहणी केल्यानंतर शहापूर येथील नवी गल्ली व विष्णू गल्ली येथील विकास कामाचा शुभारंभ करण्यासाठी आलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या कानावर आनंदनगर वडगाव येथील नाल्याची समस्या समजताच त्यांनी लागलीच त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

याप्रसंगी त्यांच्यासमवेत महापालिका, पाटबंधारे वगैरे संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते. आनंदनगर, दुसरा क्रॉस येथील नाला बांधकामाच्या पाहणीसाठी आज दुपारी एकच्या सुमारास आलेल्या मंत्र्यांसमोर स्थानिक नागरिकांनी आपली तक्रार मांडली.Satish j

सातबारा उतारा, कॉमन पीटी शीट, अनगोळ ग्रामीण नकाशा व बुडा लेआउट प्लॅन या सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये कोठेही सदर नाला अस्तित्वात असल्याचा उल्लेख नाही. मात्र तरीही दडपशाही करून जबरदस्तीने आमच्या मालमत्तांचे नुकसान करून या नाल्याचे बांधकाम केले जात आहे.

आम्हाला या पद्धतीने नाल्याची निर्मिती नको आहे तक्रार करून पाऊस व सांडपाणी निचऱ्याची समस्या निकालात काढायची असेल तर अन्य पर्याय अवलंबवावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली.

रहिवाशांनी तक्रार ऐकून घेतल्यानंतर नाराज झालेल्या मंत्री सतीश जारकीहोळी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरत सदर नाला पूर्वीपासून अस्तित्वातच नसेल तर तो निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. नाल्याचे बांधकाम तात्काळ थांबवा, असा आदेश दिला. तसेच सदर नाल्याची समस्या स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेऊन सोडवली जावी असे सांगितले. त्याचप्रमाणे सदर नाल्याचे बांधकाम खाजगी जागांमधून का करत आहात? जर संबंधित जागा मालकाने न्यायालयाकडून स्थगिती आदेश आणला तर ते निस्तरण्यासाठी तुम्ही सरकारचा म्हणजे जनतेचा पैसा वाया घालवणार आहात का? असा सवाल अधिकाऱ्यांना करून त्यापेक्षा सदर प्रकल्प सरकारी जागेतून राबवा, अशी सूचना मंत्री जारकीहोळी यांनी केली.

मंत्र्यांनी नाराज होऊन जाब विचारताच उपस्थित सर्व अधिकारी निरुत्तर झाले होते. याप्रसंगी आनंदनगर दुसरा क्रॉस येथील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता 3 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता बेळगाव महापालिकेत महापालिकेचे अधिकारी स्थानिक रहिवाशांच्या समस्या जाणून घेणार आहेत यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.