बेळगाव लाईव्ह:दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मुतगे येथील न्यू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव आणि पदवीपूर्व महाविद्यालयाचा रौप्य महोत्सव असा संयुक्त कार्यक्रम रविवार दि. 5 जानेवारी रोजी शाळेच्या मैदानावर संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसबीसी कमिटीचे सदस्य वाय. बी. संभाजीचे असणार आहेत.
जून 1974 रोजी स्थापन झालेल्या दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या मुतगे येथील पहिल्या माध्यमिक शाळेला 50 वर्षे आणि पदवीपूर्व महाविद्यालयाला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत असून पहिल्या सत्रात कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून संस्थेचे उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, सचिव विक्रम पाटील, एसबीसीचे अध्यक्ष आर. वाय. पाटील, उपाध्यक्ष सुनील अष्टेकर, उद्योजक दिलीप चिटणीस, माजी विद्यार्थी सी. के. पाटील, ग्रा. पं. माजी अध्यक्ष किरण पाटील, जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ, गटशिक्षणाधिकारी एस. पी. दासप्पणावर यांच्या उपस्थित होणार आहे. सुवर्ण महोत्सव सोहळा कमिटीचे स्वागत अध्यक्ष नारायण कणबरकर पाहुण्यांचा परिचय करून स्वागत करणार आहेत.
दुपारी 1994 95 च्या दहावी बॅचच्या वतीने स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दुसऱ्या सत्रात शाळा सुधारणा समितीच्या माजी सदस्यांचा, माजी सदस्यांच्या वारसांचा व देणगीदारांचा सत्कार होईल. तर तिसऱ्या सत्रात शाळेचे माजी मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार होणार आहे. यानंतर सूदर्शन शिंदे, सांगली यांचे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि उद्याचा भारत या विषयावर व्याख्यान होईल. सायंकाळी 7 वाजता लोकरंग कार्यक्रम होणार आहे. यावेळी उद्योजक श्रीनिवास पाटील, माजी सैनिक मनोहर कडेमनी, सुवर्ण महोत्सव सोहळा समितीचे सर्व सदस्य, आजी-माजी विद्यार्थी, पालक, गावातील विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, युवक मंडळे उपस्थित राहणार आहेत.
सर्वांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन सुवर्ण महोत्सव सोहळा कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.
संजय गोविलकर, मुंबई
पहिल्या सत्रात व्याख्याते म्हणून संजय गोविलकर उपस्थित राहणार आहेत. ते कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक पोलीस अधिकारी आहेत. सध्या ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावत आहेत. त्यांनी आपल्या विभागातील अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा निपटारा केला आहे. त्यांनी जनजागृती मोहिमा राबवल्या आहेत. व्याख्याने व चर्चासत्रांच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. 26/11 च्या घटनेत जखमी होऊनही अतिरेकी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती
. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाले आहेत. त्यापैकी स्टॉप वॉच, लाईफ लाईन, फ्लश अशी प्रसिद्ध पुस्तके आहेत. त्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक, पराक्रम पदक, पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व इतर पुरस्कार मिळाले आहेत .
दुसऱ्या सत्रात सायंकाळी सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुदर्शन शिंदे यांचे व्याख्यान होणार आहे. जबरदस्त भाषणशैली आणि तेजस्वी वाणीतून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा अपरिचित इतिहास महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवण्याचे काम केले आहे.
सुदर्शन शिंदे, सांगली…
सुदर्शन शिंदे यांनी वयाच्या चौदाव्या वर्षापासूनच विविध ठिकाणी प्रबोधनपर व्याख्याने दिली आहेत. युट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडियावर त्यांची अनेक व्याख्याने प्रसिद्ध झाली आहेत. मासिक, विशेषांक, वृत्तपत्रे यामध्ये त्यांचे विविध विषयांवरील लेख प्रसिद्ध झाले आहेत.