बेळगाव लाईव्ह : प्रयागराज कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत माजलेल्या हाहाकारात बेळगावच्या चार भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बुधवारी दुपारी कुंभमेळ्यातील मृतांची नावे प्रसारित झाल्यानंतर बेळगावमधील मृत भाविकांच्या नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार असिफ (राजू) सेठ आणि बेळगावचे तहसिलदार यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले.
कुंभमेळ्यातील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या घरासमोर दुपारपासूनच गर्दी वाढली. मृतदेह बेळगावमध्ये आणण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने सरकारच्या मदतीने प्रयत्न सुरु केले आहेत.
कर्नाटक सरकारने उत्तर प्रदेश सरकारशी संपर्क साधून प्रयागराज येथून भाविकांचे मृतदेह आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून विशेष जिल्हाधिकारी म्हणून हर्ष शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी एक पोलीस अधिकारी आणि विशेष जिल्हाधिकारी हर्ष शेट्टी अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रुती एन एस हे प्रयागराजला रवाना होणार आहेत.
बेळगाव नाजर कॅम्प वडगांव येथील ज्योती हत्तरवाड वय 48 त्यांची मुलगी मेघा हत्तरवाड वय 24 आणि अरुण कोपर्डे वय 61 आणि महादेवी रा. शिवाजी नगर वय 48 यांचा प्रयागराज येथे कुंभमेळ्याच्या चेंगरा चेंगरीत दुर्दैवी मृत्यू झाला होता.
मृत ज्योती हत्तरपाठ आणि मेघा हत्तरपाठ या दोघी मायलेकी वडगाव येथील आपल्या घराजवळच बुकस्टॉल चालवीत होत्या. ज्योती हत्तरपाठ यांच्या पश्चात पती असून दोघी मायलेकी कुंभमेळ्यासाठी रवाना झाल्या होत्या. शिवाजी नगर येथील महादेवी हनुमंत भवनूर या भाजपच्या कार्यकर्त्या होत्या. त्या शिवाजीनगर येथे भाड्याच्या खोलीत राहत होत्या. तर शेट्टी गल्ली येथील मृत अरुण कोपर्डे यांच्या पत्नी कांचन खोरपड़े या ब्युटी पार्लर चालवितात. आपल्या पत्नीसह कुंभमेळ्यातील शाहीस्नानासाठी गेल्या चार दिवसांपूर्वी ते बेळगावमधून रवाना झाले होते. मृत भाविकांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.