बेळगाव : मृत्यू प्रमाणपत्रासाठी मयताची कागदपत्रे जोडण्याऐवजी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची रेशन कार्ड वगैरे कागदपत्रे जोडून एका जिवंत व्यक्तीला मयत ठरवण्याचा प्रकार महसूल अधिकाऱ्यांनी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मात्र त्यामुळे संबंधित व्यक्तीला सरकारी सुविधा मिळणे कठीण झाल्यामुळे त्याने तहसीलदारांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.
जिवंत असूनही तहसीलदारांनी मयत ठरवलेल्या व्यक्तीचे नाव गणपत के. काकतकर असे असून ते सावगांव (ता. जि. बेळगाव) येथील रहिवासी आहेत. सावगाव येथील नागरिकांसमवेत आज त्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर केले. याबाबतची माहिती अशी की, गणपत काकतकर यांच्या आजोबांचे निधन झाले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशा वरून आपल्या आजोबांचे मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांनी तहसीलदार कार्यालयात अर्ज केला होता. मात्र मागील वर्षी म्हणजे 2023 मध्ये गणपत काकतकर यांनाच मयत घोषित केले आहे. त्यामुळे काकतकर यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. मयत घोषित करण्यात आल्यामुळे त्यांना 2023 वर्षामधील कृषी बियाणे व इतर कृषी सुविधा सरकारकडून मिळू शकल्या नाहीत.
दरम्यान आपल्यावर झालेल्या अन्याय संदर्भात गणपत काकतकर यांनी वेळोवेळी तहसीलदारांकडे दाद मागितली. परंतु त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे हताश झालेल्या गणपत काकतकर यांनी आज सोमवारी सकाळी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडेच तहसीलदारांविरुद्ध तक्रार केली आहे.
गणपत यांच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे जोडताना महसूल अधिकाऱ्यांनी मयत व्यक्तीची कागदपत्रे जोडण्याऐवजी गणपत काकतकर यांची रेशन कार्ड, आधार कार्ड वगैरे कागदपत्रे जोडल्यामुळे जिवंत व्यक्तीला मयत ठरवण्याचा हा घोळ झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी त्यांच्या समवेत त्यांचे बंधू व गावकरी उपस्थित होते.