बेळगाव लाईव्ह :मायक्रोफायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलेल्या बेळगाव जिल्ह्यातील सुमारे 15,000 महिला एका मोठ्या घोटाळ्याला बळी पडल्या असून या महिलांकडून मध्यस्थांकरवी सुमारे 100 कोटी रुपये उकळण्यात आले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
बेळगाव येथे काल मंगळवारी पत्रकारांशी बोलताना मंत्री जारकीहोळी यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी तीन सदस्यीय पोलिस पथक स्थापन करण्याची घोषणा केली.
ते म्हणाले, या महिलांना भरीव कर्जाची रक्कम मिळेल, असा विश्वास दाखवून त्यांची फसवणूक करण्यात आली. लवकरच सदर प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्यात येतील. संबंधित महिलांना कर्जासाठी अर्ज करण्यास पटवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मध्यस्थांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जाईल.
सदर घोटाळ्यात अडकलेल्या फसवणूक झालेल्या
कर्जदारांचा त्रास कमी करण्यासाठी त्या महिलांवर परतफेडीसाठी दबाव आणू नये, अशा सूचना देऊन मायक्रोफायनान्स कंपनीला आधीच निर्देश देण्यात आले आहेत. असेही मंत्री जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.