बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी -विद्यार्थिनींसाठी आयोजित भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज शनिवारी सकाळी मराठा मंदिर खानापूर रोड येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यंदा या स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून तब्बल 2500 हून अधिक स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग दर्शवला आहे.
सीमा भागातील मराठी भाषा संस्कृती व परंपरा यांचे संवर्धन तसेच शिवकालीन इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने सदर सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खानापूर रोड वरील मराठा मंदिरे येथे आयोजित सदर स्पर्धेचे आज शनिवारी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समिती व युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. याप्रसंगी मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, नेते रमाकांत कोंडुसकर, आर. एम. चौगुले, रणजीत चव्हाण -पाटील, मदन बामणे, ॲड. अमर येळ्ळूरकर, नगरसेवक रवी साळुंके, बाळासाहेब काकतकर, रमेश पावले, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन समारंभाप्रसंगी बोलताना ॲड. अमर येळ्ळूरकर म्हणाले की, अशा सामान्य ज्ञान स्पर्धांचे आपण सर्व मराठी भाषिकांनी कौतुक करून प्रोत्साहन दिले पाहिजे आज कर्नाटक सरकारकडून मराठी भाषेवर अन्याय होत असताना दुसरीकडे केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. कर्नाटकात आपल्या मराठी भाषेला सन्मान दिला जात नाही, तिच्यावर अन्याय केला जातो. त्यालाच उत्तर म्हणून आपण ही सामान्य ज्ञान स्पर्धा घेत आहोत, जेणेकरून मराठी भाषेत शिक्षण घेणाऱ्या मुलांना प्रोत्साहन मिळावे, त्यांचा उत्साह वाढवून आपल्या मातृभाषेविषयी त्यांचे प्रेम अधिक दृढ होईल असे सांगून स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांचे त्यांनी हार्दिक स्वागत व अभिनंदन केले. त्याचप्रमाणे सदर स्पर्धेच्या आयोजनासाठी परिश्रम घेणारे युवा समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिक्षकवर्गालाही धन्यवाद दिले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांची मोठी संख्या पाहता बेळगाव सीमा भागात अद्यापही मराठी भाषेचे वर्चस्व आहे हे सिद्ध होते. तसेच आजही आपली मुले मराठी भाषेतून शिकण्यास उत्सुक आहेत हे देखील स्पष्ट होते. तसेच अशा स्पर्धा यापुढे देखील घेतल्या जातील, असे ॲड. येळ्ळूरकर यांनी सांगितले.
रमेश पावले यांनी यावेळी बोलताना बेळगावमध्ये ज्या पद्धतीने भव्य प्रमाणात शिवजयंती साजरी होते त्याचे उदाहरण देऊन काही इतिहासकारांनी “भले शिवकालीन सर्व किल्ले महाराष्ट्रात असतील, मात्र शिवरायांचे खरे मावळे हे बेळगाव शहरात आहेत” असे म्हंटल्याचे सांगितले. त्यामुळे सध्या या ठिकाणी जर कर्नाटक सरकारचे कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांनी युवा समितीने आयोजित केलेल्या या सामान्य ज्ञान स्पर्धेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पहावा. मराठी भाषा व संस्कृती टिकवण्यासाठी शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी -विद्यार्थिनी किती मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी झाले आहेत ते पहावे असे सांगून केंद्राने या बाबीची दखल घेऊन सीमाप्रश्न लवकरात लवकर निकालात निघेल यासाठी प्रयत्न करावेत, असे मत पावले यांनी व्यक्त केले.
स्पर्धेबद्दल माहिती देताना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, सदर सामान्य ज्ञान स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून यंदा या स्पर्धेत 2500 हून जास्त विद्यार्थी -विद्यार्थिनींनी भाग घेतला आहे. त्यामुळे मराठा मंदिरचे सर्व हॉल तसेच ओरिएंटलचे तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन या ठिकाणी ही परीक्षा घेतली जात आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध मराठी शाळांच्या शिक्षकांसह आमचे जवळपास 100 स्वयंसेवक, पदाधिकारी कार्यरत आहेत. आज दुपारपर्यंत प्राथमिक -माध्यमिक विभागासाठी आणि त्यानंतर महाविद्यालयीन विभागासाठीची सामान्य ज्ञान स्पर्धा होणार आहे अशी माहिती देऊन स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला. त्याचप्रमाणे यंदा या स्पर्धेत बेळगावसह खानापूर, निपाणी वगैरे भागातील स्पर्धकांचा समावेश असून आजच्या घडीला बेळगावसह संपूर्ण कर्नाटक राज्यात घेतली जाणारी ही सर्वात मोठी सामान्य ज्ञान स्पर्धा असल्याचेही त्यांने सांगितले.