बेळगाव लाईव्ह : 14 फेब्रुवारी रोजी विद्यमान महापौर सविता कांबळे आणि उपमहापौर आनंद चव्हाण यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार असून महापौर – उपमहापौर निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला आहे. 23 व्या महापौर-उपमहापौर निवडणुकीबाबत प्रादेशिक आयुक्त निर्णय घेऊन तारीख निश्चित करणार आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता प्रादेशिक आयुक्तांच्या निर्णयाकडे लागून राहिल्या आहेत.
बेळगाव महापालिकेत लोकनियुक्त नगरसेवक 58, लोकसभा सदस्य 2, विधानसभा सदस्य 4, विधान परिषद सदस्य 1 असे एकूण 65 मतदार निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावू शकतात.
14 फेब्रुवारीला महापौर-उपमहापौरांचा कार्यकाळ संपणार असला तरीदेखील सोमवार दि. 20 पर्यंत प्रादेशिक आयुक्त कार्यालयाला मनपाकडून प्रस्ताव पाठविला नव्हता. पण दोन दिवसांपूर्वी निवडणुकीसंदर्भात प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा प्रादेशिक आयुक्तांच्या निर्णयाकडे लागून राहिल्या आहेत.
महापालिकेत 58 नगरसेवक असून यावेळच्या निवडणुकीत भाजपने पक्षाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविल्याने याचा फायदा भाजपला झाला. त्यामुळे 35 नगरसेवक निवडून आले. तर काँग्रेस व एमआयएमचे 10 सदस्य आहेत. दोन अपक्ष नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. मनपा विरोधी गटनेतेपद काँग्रेसकडे आहे. म. ए. समितीचे तीन नगरसेवक असून ते देखील विरोधी गटात आहेत.
यावेळी महापौरपद सामान्य प्रवर्गासाठी तर उपमहापौर सामान्य महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे या दोन्ही पदांसाठी चुरस निर्माण होणार, यात शंका नाही. निवडणुकीच्या तयारीसाठी महापालिकेच्या कौन्सिल विभागाकडून प्रादेशिक आयुक्त कार्यालयाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
महापौर व उपमहापौर पदासाठीचे आरक्षण कोणते आहे? याची माहिती प्रस्तावात नमूद करण्यात आली आहे. तसेच निवडणुकीत एकूण मतदारसंख्या किती आहे? याची देखील माहिती देण्यात आली आहे.
या माहितीच्या आधारावर प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडून निवडणुकीची तयारी केली जाणार आहे. लवकरच तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. 14 फेब्रुवारी रोजी महापौर-उपमहापौरांचा कार्यकाळ संपणार असल्याने याआधी निवडणूक होणार की या प्रक्रियेला विलंब लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.