Sunday, January 5, 2025

/

मराठा बँक, तुकाराम बँक चेअरमन, व्हा. चेअरमन निवडणूक बिनविरोध

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील प्रतिष्ठित मराठा को-ऑपरेटिव्ह बँक आणि श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक आज बुधवारी बिनविरोध पार पडली.

मराठा बँकेच्या चेअरमनपदी बाळाराम पाटील व व्हा. चेरमनपदी शेखर हंडे यांची, त्याचप्रमाणे तुकाराम बँकेच्या चेअरमनपदी पुनश्च पाचव्यांदा प्रकाश मरगाळे यांची तर व्हा. चेअरमनपदी नारायण पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

मराठा को-ऑपरेटिव्ह बँक आणि श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँक या बेळगाव शहरातील प्रतिष्ठित बँकांच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुका नुकत्याच शांततेत पार पडल्या. या निवडणुकांमध्ये दोन्ही बँकांच्या सत्ताधारी गटांच्या पॅनलने निर्विवाद विजय संपादन केला.

संचालक मंडळाची निवडणूक पार पडल्यानंतर आज बुधवारी बँकेचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन या पदांची निवडणूक झाली. सदर निवडणूक बिनविरोध होऊन मराठा बँकेच्या चेअरमनपदी बाळाराम पाटील व व्हा. चेरमनपदी शेखर हंडे यांची, त्याचप्रमाणे तुकाराम बँकेच्या चेअरमनपदी प्रकाश मरगाळे व व्हा. चेअरमनपदी नारायण पाटील यांची निवड करण्यात आली.

सदर निवडणुकीनंतर बँकेच्या कार्यालयीन सभागृहामध्ये नूतन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचे उपस्थित संचालक तसेच हितचिंतकांनी पुष्पहार अर्पण करून अभिनंदन केले. सत्काराबद्दल आभार प्रकट करून आपले मनोगत व्यक्त करताना तुकाराम बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे म्हणाले की, मध्यंतरी आमच्या बँकेची परिस्थिती थोडी बिकट झाली होती.

मात्र त्यावेळी आमचे सर्व संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धैर्याने त्या परिस्थितीवर मात केली. मी गेल्या 2007 साली चेअरमन झालो, आजच्या घडीला चेअरमन होण्याची ही माझी सलग पाचवी वेळ आहे. या माझ्या कार्यकाळात सर्व संचालक तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मला संपूर्ण सहकार्य केले आहे.Tukaram bank

आज तुकाराम बँकेची आर्थिक परिस्थिती मजबूत आहे. एकेकाळी त्या बँकेचा राखीव निधी अत्यंत कमी होता जो आज 10 ते 12 कोटी रुपयांहून अधिक आहे. त्याचप्रमाणे पूर्वी आम्ही संचालक झालो त्यावेळी बँकेच्या कायम ठेवी 21 -22 कोटी रुपयांच्या होत्या, आज त्या 54 कोटी रुपयांच्या जवळपास गेल्या आहेत. आम्ही घाई गडबड न करता संथ गतीने बँकेचा विकास साधण्यास प्राधान्य देत आहोत. कायम ठेवी वाढवण्यासाठी व्याजाचा टक्का वाढवून भविष्यात अडचणी निर्माण करण्याचा आमचा विचार नाही. त्यामुळे व्याजाचा दर आम्ही कायम ठेवला असून बँक चालवण्यासाठी 3 ते 4 टक्के फरक आवश्यक असताना 2 टक्के व्याजाच्या फरकातच आम्ही बँक चालवतो असे सांगून चेअरमन मरगाळे यांनी बँकेच्या कामकाजाबद्दल माहिती दिली.

भागधारकांच्या विश्वासाला पात्र ठरण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही नेहमी कार्यरत असतो. सामाजिक उपक्रमांना देखील आमची बँक शक्य होईल तितके सहाय्यक करत असते असे त्यांनी सांगितले. तसेच यावेळची चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड ही सर्वानुमते खुल्या मनाने बिनविरोध झाल्याचे चेअरमन प्रकाश मरगाळे यांनी स्पष्ट केले.

मराठा बँकेचे नूतन चेअरमन बाळाराम पाटील आणि व्हा. चेअरमन शेखर हंडे यांनी देखील आपल्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना संचालक मंडळासह बँकेचे भागधारक आणि समस्त खातेदारांचे आभार मानले. त्याचप्रमाणे बँकेच्या उत्कर्षासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.