बेळगाव लाईव्ह: पडल्या भरण्याच्या धार्मिक कार्यासाठी आपल्या कुटुंबासोबत खानापूर येथील मलप्रभा नदी काठावर गेलेला युवक बुडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली आहे.
खानापूर येथील मलप्रभा नदीच्या काठावर शेकडो भाविकांची धार्मिक विधीसाठी गर्दी होत आहे. यात्रेला जाऊन आल्यावर अनेक जण नदीची पूजा करण्यासाठी आणि धार्मिक विधी करण्यासाठी खानापूर ला येत असतात.
बेळगाव तालुक्यातील मन्नूर गावचा युवक
धार्मिक कार्य व पडली भरण्याच्या कार्यासाठी आपल्या कुटुंबासोबत खानापूर येथील श्री मलप्रभा नदीला आला होता पाण्यात उतरल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याची घटना रविवार 26 रोजी दुपारी घडली. समर्थ मल्लाप्पा चौगुले (वय 22) असे या घटनेत मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
या घटनेत मयत झालेला समर्थ चौगुले कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. एक वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते व त्यापूर्वी त्याच्या भावाचे सुद्धा आजाराने निधन झाले होते त्यामुळे त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला असून या घटनेने मन्नूर गावात हळहळ व्यक्त होत आहे.
रविवारी दुपारी युवक नदीत बुडाल्याची बातमी कळताच अग्निशामक दल व खानापूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत युवकाचा मृतदेह शोध कार्य सुरू ठेवले होते. अग्निशामक दलाचे मनोहर राठोड तसेच खानापूर पोलीस स्थानकाचे पीआय लालसाब गोवंडी सह पोलीस कर्मचारी दुपारपासून शोध घेत होते. परंतु मृतदेह सापडत नव्हता. शेवटी हेल्पलाइन इमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशनच्या टीमने पाण्यामध्ये कॅमेरा सोडून शोध घेतला असता, सदर युवकाचा मृतदेह सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सापडला.
एचईआरएफ टीमचे प्रमुख बसवराज ढुंडय्या हिरेमठ यांनी कॅमेराद्वारे मशीन मधून आपल्या सहकाऱ्यांना मृतदेह असलेल्या जागेचे लोकेशन सांगितले. त्यानंतर रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर खानापूर पोलिसांनी जागेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठविला.