बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना सकाळ सकाळी लोकायुक्त विभागाने दणका दिला आहे. बेकायदेशीर संपत्ती जमवल्याच्या आरोपावरून लोकायुक्त खात्याने शासकीय बाबूंच्या घरावर धाड टाकली आहे.बेळगावचे लोकायुक्त एस पी हनुमंत राय यांच्या नेतृत्वाखाली दोन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावर धाडी टाकल्या आहेत.
बेळगाव उत्तर विभागाचे सब रजिस्ट्रार सचिन मंडेद आणि रायबागच्या कवटीकोप चे पशुवैद्य अधिकारी संजय दुर्गान्नावर यांच्या घरावर धाडी पडल्या आहेत.
बेळगाव शहरातील अनगोळ सह हारुगेरी, बेल्लद बागेवाडी या ठिकाणी या धाडी एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या आहेत. बेळगाव शहरातील अनगोळ येथे लोकायुक्त पोलीस निरीक्षक निरंजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सचिन मंडेद यांच्या घरावर छापा टाकून चौकशी सुरु करण्यात आली आहे.
बेळगाव शहरातील सब रजीस्ट्रार कार्यालयात चाललेला भ्रष्टाचार सर्वश्रुत आहे याची दखल लोकायुक्त खात्याने घेत उत्तर विभागाचे उप नोंदणी अधिकारी सचिन मंडेद यांच्या घरावर धाड टाकून चौकशी सुरु केली आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी शहरात आयकर खात्याने उद्योजक व्यापाऱ्यावर टाकलेल्या धाडीनंतर लोकायुक्त खात्याने सब रजिस्ट्रार अधिकाऱ्यावर टाकलेल्या धाडीची जोरदार चर्चा आहे त्यामुळे अनेक सरकारी अधिकाऱ्यांचे धाबे देखील दणाणले आहेत.