बेळगाव लाईव्ह: कॅम्प येथील केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज रविवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथील विजय चौकात पाईप ब्रँडचे अभूतपूर्व सादरीकरण केले. बेळगावच्या इतिहासात हा ऐतिहासिक क्षण असून प्रत्येक बेळगावकराचा ऊर अभिमानाने भरून आला.
संपूर्ण देशभरात आज प्रजासत्ताक दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. नवी दिल्ली येथील विजय चौकात लष्करी कवायती आणि विविध राज्यांच्या शोभायात्रांनी लाखो लोकांचे डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच पाईप ब्रँडचे सादरीकरण करून बेळगावच्या इतिहासात मानाचा तुरा खोवला.
विद्यार्थ्यांच्या या सादरीकरण बाबत शाळेने अभिमान व्यक्त करत विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात आज नवी दिल्लीतील विजय चौकात आमच्या प्रतिभावान विद्यार्थ्यांनी एक असाधारण बँड सादरीकरण केले. त्यांचे कठोर परिश्रम, समर्पण आणि शिस्त या भव्य व्यासपीठावर खरोखरच चमकली, ज्यामुळे आम्हाला सर्वांना खूप अभिमान वाटला.
हा उल्लेखनीय टप्पा गाठल्याबद्दल आमच्या विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि मार्गदर्शकांचे कौतुक. अशा शब्दात शाळा प्रशासनाने विद्यार्थी आणि शिक्षकांना कौतुकाची थाप दिली आहे.
राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेत केंद्रीय विद्यालय क्र. २ ला उत्तेजनार्थ पारितोषिक
शालेय बँड स्पर्धेत बेळगावच्या केंद्रीय विद्यालय क्रमांक २ या शाळेच्या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले
या स्पर्धेचा अंतिम फेरीचा समारोप २४ आणि २५ जानेवारी २०२५ रोजी नवी दिल्ली येथे झाला. संरक्षण मंत्रालयाने नियुक्त केलेल्या निर्णायक मंडळात सशस्त्र दलाच्या प्रत्येक शाखेतील सदस्यांचा समावेश होता. या समितीने विजेत्यांची आणि पारितोषिक विजेत्यांची निवड केली. देशभरातील शाळांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत, विद्यार्थ्यांनी आपले संगीत कौशल्य सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. केंद्रीय विद्यालय क्र. २ (बेळगाव कॅम्प)च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यामुळे त्यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरविण्यात आले.
स्पर्धेतील विजेते आणि सर्व सहभागी शाळांचे संरक्षण मंत्रालयाने अभिनंदन केले असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक आणि कलात्मक कौशल्याला चालना मिळते, असे गौरवोद्गार काढण्यात आले.