बेळगाव लाईव्ह : ज्येष्ठ कामगार नेते, स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता निधन झाले. ते 97 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन चिरंजीव प्रा. आनंद मेणसे, ऍड. संजय मेणसे, कन्या सौ. लता पावशे, श्रीमती नीता पाटील व नातवंडे आहेत. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. सोमवारी रात्री आठ वाजता सरस्वती नगर येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सच्चा कम्युनिस्ट वादी कडवा सीमा सत्याग्रही, उत्कृष्ट वाकपटू, लेखक, संपादक, अश्या विविध भूमिकेतून त्यांची कारकीर्द बेळगाव परिसरात सतत गाजत राहिली. महाराष्ट्रात ज्यांच्या शब्दाला वजन आहे असे सीमाभागातील मेणसे सर हे हाडाचे कार्यकर्ते होते. बेळगाव सह सीमा भाग महाराष्ट्रात विलीन व्हावा यासाठी त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला. आपल्या विचारांची प्रामाणिक असणारा नेता अशी त्यांची ओळख होती.त्यांनी केलेली अनेक आंदोलने आजही लोकांच्या स्मरणात आहेत. सीमा भागात ‘आप्पा’ या आदरार्थी नावाने परिचित असणारे कॉ. कृष्णा मेणसे सीमालढ्याचा चालता बोलता इतिहास होता. अंधश्रद्धा निर्मूलन, भ्रष्टाचार निर्मूलन आणि सीमा लढा यात त्यांची भरीव कामगिरी कायम स्मरणात राहील अशीच आहे.
सीमाप्रश्नाच्या चळवळीतील एक अग्रणी नाव म्हणजे कॉ. कृष्णा मेणसे. सीमाप्रश्नाच्या चळवळीत त्यांचे योगदान महत्वाचे आहे. 1956 साली तब्बल 1 वर्षे कारावास भोगत आपली बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडताना तेंव्हाच मराठीत बोलून त्यांनी मराठीची शान तर वाढविलीच, शिवाय पावलोपावली मराठीचा दुस्वास करणाऱ्या सरकारला मराठी भाषिकांना त्यांचे हक्क मराठीतच द्यावे लागतील हे ठासून सांगितले. सीमाप्रश्नासाठीचे लढवय्ये आंदोलक, सीमाभागातील कामगार, कष्टकऱ्यांचे नेते अशी त्यांची ओळख होती.
गेली 80 वर्षांहून अधिक काळ श्रमिक, कष्टकरी, कामगार शेतमजूर यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे आणि बिदर-भालकी, बेळगांव-कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी आपले आयुष्य वेचणारे कॉ. कृष्णा मेणसे यांना अलीकडेच राष्ट्रवीर कार पुरस्काराने गौरविण्यात आले होते. यासह आजवर त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
लोकशाहीर द. ना. गव्हाणकर यांच्यासोबत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत खांद्याला खांदा लावून लढलेले कॉ कृष्णा मेणसे यांनी तब्बल अकरा महिण्याहून अधिक काळ महाराष्ट्र कर्नाटक सीमा लढ्यासाठी तुरुंगवास भोगाला. एका बाजूला भाषावार प्रांतरचनेत कर्नाटकात राहिलेल्या मराठी भाषिकांच्या न्याय हक्कासाठी लढत असताना लाल बावटा खांद्यावर घेऊन बेळगांव परिसरातील श्रमिक कष्टकऱ्यांचे अनेक लढे त्यांनी लढविले. गोकाक येथील गिरणी कामगारांचा प्रश्न असो कि हिंडालको कंपनीच्या कामगारांना न्याय देणे असो कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. कामगारांच्या बरोबरच खानापूर तालुक्यातील त्यांनी काढलेला शेतकऱ्यांचा बंदूक मोर्चा विशेष गाजला होता.
चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम करीत असताना त्यांनी पत्रकारिताही केली. हेमंत नावाचे मासिक आणि नंतर साम्यवादी नावाने साप्ताहिक सुरु करून आपल्या लेखणीतून कष्टकरी श्रमिकांचे प्रश्न मांडले. त्यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा मोठा प्रभाव होता. राष्ट्रवीरकार शामराव देसाई यांच्यासोबत बेळगांव परिसरात सत्यशोधक विचारांच्या प्रसाराचे त्यांनी काम केले. कार्यकर्ता पत्रकार म्हणून काम करीत असताना त्यांनी उत्तम वैचारिक साहित्यही जन्माला घालून प्रबोधनाच्या चळवलीला गती देण्याचे काम केले आहे. हो ची मिन्ह यांचे चरित्र, बसवेश्वर ते ज्ञानेश्वर, अशा तोडल्या बेड्या, असा लढलो असा घडलो, गोठलेली धरती पेटलेली मने, गोवा मुक्ती आंदोलन, डॉ आंबेडकर आणि बुद्धधर्म याबरोबर विरगाथा या कन्नड पुस्तकाचे अनुवादन, परिक्रमा प्रवासवर्णन, वीरराणी कित्तूर चन्नमा इतके विपुल लेखन आपल्या धकाधकीच्या आयुष्यात केले आहे. त्यांच्या जाण्याने सीमाप्रश्न चळवळ, साहित्य विश्व, पत्रकारिता आणि कामगारांच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.