बेळगाव लाईव्ह :बेहिशेबी मालमत्तेच्या वाढते आरोप व तक्रारींची दखल घेत लोकायुक्त अधिकाऱ्यांनी खानापूर तहसीलदार प्रकाश श्रीधर गायकवाड यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर आज बुधवारी सकाळी अचानक छापे टाकले.
तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या गणेशपूर, बेळगाव येथील निवासस्थानापासून सुरू झालेली लोकायुक्त अधिकाऱ्यांची छापेमारी त्यानंतर निपाणी आणि खानापूर येथील त्यांचे कार्यालय व घरापर्यंत पसरली. बेळगावचे लोकायुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक (एसपी) हणमंतराय यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली ही कारवाई कोणत्याही प्रतिकार किंवा व्यत्ययाशिवाय पार पडली.
लोकायुक्त छाप्याच्या तपासाचा भाग म्हणून महत्त्वाच्या कागदपत्रांची आणि रेकॉर्डची छाननी केली जात आहे. छापा टाकणाऱ्या लोकायुक्त पथकामध्ये पोलीस उपाधीक्षक पुष्पलथा आणि पोलीस निरीक्षक निरंजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
हे लोकायुक्त पथक आरोपांशी संबंधित तपशील उघड करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. लोकायुक्तांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवल्याने या प्रकरणात पुढील आणखी काही घडामोडी अपेक्षित आहेत.
दरम्यान लोकायुक्त पोलीस अधिकाऱ्यांच्या या छाप्यामुळे खानापूर तहसीलदार कार्यालयात खळबळ उडाली आहे.