बेळगाव लाईव्ह :खादरवाडी येथील मेन रोड अर्थात मुख्य रस्त्याचे विकास निविदेनुसार झालेले नसून ते अर्धवट अवस्थेत करण्यात आले आहे. त्यामुळे गैरसोय निर्माण होऊन अपघाताच्या घटना घडत आहेत याची गांभीर्याने दखल घेऊन येत्या सात दिवसात सदर रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण करण्यात यावे अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा खादरवाडी येथील श्रीराम सेना हिंदुस्थान शाखा आणि शेतकरी संघटनेने दिला आहे.
कर्नाटक सरकारच्या ग्रामीण विकास आणि पंचायत राज खात्याच्या ‘नम्म ग्राम नम्म् रस्ते’ या योजनेअंतर्गत गेल्या 2017 -18 या आर्थिक वर्षामध्ये खादरवाडी येथील मुख्य रस्त्याचे विकास काम मंजूर करण्यात आले. यानंतर ऑक्टोंबर महिन्यामध्ये श्रीराम सेना हिंदुस्तान आणि शेतकरी संघटना खादरवाडीच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चातून या रोडची डागडुजी केली होती.
त्यानंतर पाचव्या आणि सहाव्या वर्षासाठी या 1.8 कि.मी. रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निधी मंजूर झाला असला तरी 10 जानेवारी 2025 पर्यंत अर्धवट डांबरीकरण करण्यात आले आहे. याबद्दल जाब विचारून रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण करून घेण्याऐवजी गावातील कांही राष्ट्रीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी या अर्धवट डांबरीकरण झालेल्या रस्त्याचे उद्घाटनही केले.
याला श्रीराम सेना हिंदुस्तान आणि शेतकरी संघटना खादरवाडी यांनी वाचा फोडली असून ठरलेल्या निवेदनानुसार आणि मंजूर झालेल्या योजनेनुसार या 1.8 कि.मी.च्या रस्त्याचे विकास काम करण्यात यावे अशी लेखी मागणी जिल्हाधिकारी आणि ग्रामीण रस्ते विकास खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच येत्या सात दिवसाच्या आत हे काम पूर्ण करावं नाहीतर रास्ता रोको करण्यात येईल, असा सज्जड इसारा देण्यात आला आहे.
या संदर्भात बेळगावला लाईव्हशी बोलताना खादरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील यांनी सांगितले की, गेल्या 2017 18 आर्थिक वर्षात खादरवाडी गावाच्या 1.8 कि.मी. अंतराच्या मेन रोड अर्थात मुख्य रस्त्याच्या विकास कामाला मंजुरी मिळाली होती. हे विकास काम ग्रामीण अभिवृद्धी आणि पंचायत राज्य खात्याच्या ‘नम्म ग्राम नम्म रस्ते’ या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आले आहे.
पहिल्या वर्षी 2017 -18 मध्ये रस्त्याचे विकास काम करण्यात आल्यानंतर अलीकडे पाचव्या व सहाव्या वर्षात नव्याने डांबरीकरण व डागडुजी करण्यात आली. मात्र ती देखील अर्धवट अवस्थेत केली गेली. या कामासाठी सुमारे 14.5 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असताना अर्धवट विकास काम झालेल्या या रस्त्याचे गेल्या 10 जानेवारी 2025 रोजी गावातील काही पुढाऱ्यांनी उद्घाटन केले जे चुकीचे आहे. त्यामुळे या रस्त्याचे विकास काम अर्ध्यावर का बंद करण्यात आले? जाणून बुजून तर हे काम बंद पाडण्यात आलेले नाही ना? याचे स्पष्टीकरण आम्हाला हवे आहे.
सध्या अर्धवट खराब रस्त्यामुळे अपघाताच्या घटना घडत असून त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. गेल्या सप्टेंबर महिन्यात श्रीराम सेना हिंदुस्तान व खादरवाडी येथील कार्यकर्त्यांनी स्वखर्चातून श्रमदानाने या मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवले होते. तसेच या रस्त्याचे त्वरित नूतनीकरण केले जावे अशी मागणी करून आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र तरीही अद्याप या रस्त्याचा संपूर्ण विकास साधण्यात आलेला नाही. यासाठी आम्ही जिल्हाधिकारी आणि कर्नाटक राज्य ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य खात्याकडे तक्रार करून संपूर्ण रस्त्याचा विकास साधण्याची मागणी केली आहे याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील यांनी दिली.