बेळगाव लाईव्ह : त्रैमासिक के.डी.पी. बैठकीत जिल्ह्यातील विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. रुग्णालये, पाणीवाटप, औद्योगिक क्षेत्रासाठी लागणाऱ्या सुविधा आणि शासकीय शाळांच्या विकासाशी संबंधित विविध मुद्दे चर्चिले गेले.
त्रैमासिक के.डी.पी. बैठकीत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे काम लांबणीवर जात आहे, त्यामुळे आरोग्य सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी टप्प्याटप्प्याने सेवा चालू करावी आणि त्यानंतर औपचारिक उद्घाटन करावे, असे स्पष्ट केले. तसेच जिल्ह्यातील जलाशयांमध्ये औद्योगिक उपयोगासाठी राखीव ठेवलेल्या पाण्याच्या वापराबाबत सर्व माहिती तपासून शासनाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
औद्योगिक विकासासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य करावे आणि खाजगी जमीन खरेदी करून मोठ्या उद्योगांसाठी प्रोत्साहन देण्याची हमी दिली. याशिवाय औद्योगिक विकासासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
विधान परिषदेचे सदस्य नागराज यादव यांनी रुग्णालयाच्या उद्घाटनाची प्रक्रिया गतीमान करण्यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालयाचे व्यवस्थापन जिल्हा प्रशासनाकडे सोपवले जावे आणि सरकारी कॅन्सर रुग्णालय बेळगाव शहरात स्थापन केले जावे. तसेच, शाळांना आवश्यक मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात आणि औद्योगिक क्षेत्रात अधिक रोजगार निर्माण करण्यासाठी ठोस पावले उचलावी, अशी त्यांची मागणी होती.
विधान परिषदेचे सदस्य साबण्णा तळवार यांनी त्यांच्या निधीतून शाळांच्या विकासासाठी हाती घेतलेल्या कामांमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आणले. या समस्या त्वरित सोडवाव्यात, जेणेकरून शैक्षणिक विकासासाठी उभारणी होऊ शकेल, अशी मागणी त्यांनी केली.
आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी हिडकल जलाशयाच्या पाण्याचा औद्योगिक क्षेत्रात वापर करण्यासंदर्भात चिंता व्यक्त केली. हिडकल जलाशयातील पाणी औद्योगिक उद्देशांसाठी वाहून नेण्यासाठी परवानगी दिलेली नसल्यास तत्काळ काम थांबवावे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, हिडकल जलाशयातून 0.58 टीएमसी पाणी धारवाड व कित्तूर औद्योगिक क्षेत्रांना नियमानुसार वाटप केले जाते. जलाशयाच्या मागील बाजूचे जे पाणी वापरले जात नाही; फक्त सोडण्यात आलेले पाणीच यासाठी वापरण्याची परवानगी आहे.
राज्यसभेचे सदस्य ईरन्ना कडाडी यांनी बेळगावमध्ये ऑटोमोबाईल उद्योगासाठी मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. या उद्योगांसाठी जमीन ओळखून, अधिक उद्योगपतींना प्रोत्साहन देऊन मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सभेत जिल्ह्यातील औद्योगिक विकास, आरोग्य सुविधा, जलवाटप आणि शासकीय प्रकल्पांशी संबंधित मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून विकास प्रकल्पांना गती द्यावी, असा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला.