बेळगाव लाईव्ह : अनगोळ येथील धर्मवीर संभाजी स्मारक उद्घाटन आणि मूर्ती अनावरण सोहळ्यादरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सातारा येथील शिवेंद्र राजे भोसले यांनी ‘जय महाराष्ट्र’ घोषणा दिल्याने कन्नड संघटनांचा तिळपापड होत आहे.
स्थानिक लोकप्रतििधीं सह महापौर आणि उपमहापौरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात शिवेंद्र राजे भोसले यांनी जय महाराष्ट्र घोषणा दिली. यामुळे पोटशूळ उठलेल्या कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज महानगरपालिकेत शिरून गोंधळ माजविण्याचा प्रयत्न केला.
बेळगाव महापालिकेत धर्मवीर संभाजी महाराज मूर्तीच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर कानडी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत महापालिकेवर मोर्चा काढून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या संघटनांनी ‘जय महाराष्ट्र’ घोषणेवर आक्षेप घेत धिंगाणा घातला.
या घटनेनंतर कानडी संघटनांनी महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न करत महापौर, उपमहापौर आणि उपस्थित मराठी लोकप्रतिनिधींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी ‘जय महाराष्ट्र’ विरोधात आक्रमक प्रतिक्रिया देत त्यांनी महापालिकेच्या कामकाजावरही आक्षेप घेतला.
कानडी संघटनांनी महापालिकेच्या बरखास्तीची मागणी केली आहे. यावेळी महापालिकेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही करवे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.