बेळगाव लाईव्ह :बांगलादेशमध्ये अटक झालेल्या इस्कॉन मधील गुरु चिन्मय कृष्णदास प्रभू स्वामीजींची मुक्तता करावी या मागणीसाठी, तसेच तेथील हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांसह महिलांवर केल्या जात असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ इस्कॉन बेळगाव शाखा, नागरिक हित रक्षण समिती व विविध हिंदू संघटनांतर्फे आज बुधवारी शहरात हिंदू जनअक्रोश मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.
शहरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे आज बुधवारी सकाळी प्रारंभी इस्कॉनच्या स्वामीजींच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, हर हर महादेव, वंदे मातरम अशा घोषणा देऊन उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांनी चौक दणाणून सोडला होता.
त्यानंतर जमलेले इस्कॉन मंदिराचे भक्त आणि विविध हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी धर्मवीर संभाजी महाराज चौकातील महाराजांच्या मूर्ती समोरील मानवी साखळी करून रास्ता रोको केला. सुमारे तासभर चाललेल्या या रास्ता रोकोमुळे सदर दुपदरी मार्गावरील एका बाजूची वाहतूक कांही काळ ठप्प झाली होण्याबरोबरच चौकातील वाहनांची रहदारी विस्कळीत झाली होती. यावेळी आंदोलनात सहभागी झालेले कार्यकर्ते देत असलेल्या घोषणा आणि त्यांच्या हातातील निषेलाचे फलक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
या आंदोलनानंतर हिंदू जन आक्रोश मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चामध्ये स्थानिक इस्कॉनच्या स्वामीजींचा असंख्य भक्त त्याचप्रमाणे नागरिकतरक्षण समिती, विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. धर्मवीर संभाजी महाराज चौकातून प्रारंभ झालेला हा हिंदू जन अक्रोश मोर्चा किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, खडेबाजार, शनिवार खूट, काकती वेस रोड राणी चन्नम्मा सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. त्या
ठिकाणी इस्कॉनचे स्वामीजी, नागरिक हितरक्षण समिती बेळगावचे संयोजक डॉ. बसवराज भागोजी, सहसंयोजक रोहन जुवळी आदींच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारे हल्ले आणि इस्कॉनच्या चिन्मय कृष्णदास प्रभू स्वामीजींच्या अटकेच्या निषेधाचे, तसेच त्यांच्या सुटकेच्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.