बेळगाव लाईव्ह : अनगोळमध्ये उभारण्यात आलेल्या धर्मवीर संभाजी महाराज स्मारकाच्या उद्घाटन समारंभात महाराष्ट्राचे शिवेंद्रराजे भोसले यांनी जय महाराष्ट्र घोषणा दिल्याने कन्नड संघटनांना पोटशूळ उठला असून या घोषणेविरोधात गेल्या आठवड्याभरापासून बेळगावमध्ये कन्नड संघटनांचे तथाकथित नेते रस्त्यावर उतरून धिंगाणा घालत आहेत.
सोमवारी करवे शिवरामेगौड गटाने आंदोलन करत दक्षिण मतदार संघाचे आमदार व महापौरांना पदावरून हटवण्याची मागणी करत महानगरपालिकेला घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
अनगोळ येथील धर्मवीर संभाजी महाराजांच्यास्मारकाचे महाराष्ट्राचे शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी जय महाराष्ट्रची घोषणा देण्यात आली. या घोषणेला पाठिंबा देत टाळ्या वाजवणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधी व महापौर सविता कांबळे यांना पदावरून हटवण्याची मागणी करीत करवे शिवरामेगौड गटाने आंदोलन केले. महाराष्ट्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत जय महाराष्ट्रची घोषणा होणे हे निंदनीय आहे.
ही घटना राज्यद्रोह असून, याला पाठिंबा देणाऱ्या आमदार व महापौर यांनी तातडीने राजीनामा द्यावा. अन्यथा, पुढील आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा देत मनपासमोर करवे शिवरामगौडा गटाने धिंगाणा घातला.
यावेळी आंदोलनादरम्यान महापौर व आमदार यांच्या फोटो हातात घेऊन निषेध नोंदवत वातावरण गढूळ करण्यात आले. यादरम्यान गोंधळ माजविणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.