Thursday, January 30, 2025

/

इस्कॉनतर्फे 1, 2 फेब्रु. रोजी 27 वा हरेकृष्ण रथयात्रा महोत्सव

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सालाबाद प्रमाणे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ अर्थात इस्कॉनतर्फे येत्या शनिवार दि. 1 व रविवार दि. 2 फेब्रुवारी 2025 रोजी 27 व्या हरेकृष्ण रथयात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हजारो भक्ताच्या उपस्थितीत भक्तिभावाने हा महोत्सव साजरा केला जाणार आहे, अशी माहिती इस्कॉन बेळगाव शाखेचे अध्यक्ष प.पू. श्री भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी दिली.

शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरामध्ये आज बुधवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. श्री भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणा येथे सर्वप्रथम इस्कॉनची रथयात्रा सुरू झाली. सुरुवातीला यात्रेमध्ये केवळ शेकडो लोक सहभागी व्हायचे पण त्यानंतर हजारो लोकांचा सहभाग यात वाढला असून आता ही यात्रा जगातील अनेक देशांमध्ये दरवर्षी साजरी केली जाते. भारतामध्ये तर अनेक शहरांमध्ये ही रथयात्रा साजरी होत असून तो त्या त्या शहराचा उत्सव बनत आहे. बेळगावात या रथयात्रेची सुरुवात 1998 साली करण्यात आली. गेल्या 27 वर्षापासून कोणताही खंड न पडता ही रथयात्रा अखंडपणे सुरू आहे. येथेही सुरुवातीला फक्त शहरातील काही भक्त सहभागी व्हायचे मात्र आता या रथयात्रेचे लोण जिल्ह्यातच नव्हे तर देशभरात सगळीकडे पसरले असून देश विदेशातून काही भक्त या रथयात्रेत दरवर्षी सहभागी होत आहेत.

बेळगावात यंदा येत्या 1 व 2 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या 27व्या हरेकृष्ण रथयात्रा महोत्सवांतर्गत पहिल्या दिवशी शनिवारी दुपारी 1:15 देश-विदेशातून आलेल्या ज्येष्ठ भक्तांच्या हस्ते आरती करून 1:30 वाजता शहरामध्ये भव्य अशी श्री राधा कृष्ण रथयात्रा काढण्यात येईल. शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौकामधून प्रारंभ होणाऱ्या ही रथयात्रा कॉलेज रोड, शनिवार खुट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, पाटील गल्ली, कपिलेश्वर ब्रिज, कपिलेश्वर रोड, एसपीएम रोड, खडेबाजार, शहापूर, नाथ पै सर्कल, बीएमके आयुर्वेदिक कॉलेज रोड, गोवावेस मार्गे शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथील इस्कॉन मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या मैदानावर सायंकाळी 6:30 वाजता समाप्त होईल. या रथयात्रेमध्ये अग्रभागी श्री राधाकृष्ण आणि इस्कॉनचे संस्थापक प.पू. श्री भक्तीवेदांत स्वामी श्री प्रभुपाद यांची मूर्ती असलेला भव्यरथ असणारा आहे.Iskcon

 belgaum

रथयात्रेमध्ये सजवलेल्या बैलजोड्या, बैलगाड्या व किर्तन पथके भाग घेणार असून भगवद्गीतेवर आधारित विविध प्रसंग दर्शवणारे चित्ररथ सहभागी झालेले असतील. रथयात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी पुष्पवृष्टी होणार असून भाविकांना पाणी, सरबत आणि फळांचे वाटप केले जाणार आहे. तसेच नागरिकांना प्रसादाच्या 50 हजार पाकिटांचे वाटप केले जाणार आहे. संपूर्ण मार्गावर अतिशय सुंदर अशा रांगोळ्या घातल्या जाणार असून त्यासाठी एक संपूर्ण युनिट कार्यरत आहे.

दोन दिवस चालणाऱ्या या 27 व्या हरेकृष्ण रथयात्रा महोत्सवामध्ये स्थानिक भक्तांसह महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आदी राज्यांसह अमेरिका वगैरे पाश्चात्य देशातील भक्तमंडळी देखील हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे यामध्ये मॉरिशियस येथील इस्कॉनचे प.पू. श्री चैतन्य स्वामी महाराज यांचा समावेश असेल. श्री राधा गोकुळानंद मंदिराच्या पाठीमागील बाजूस भव्य असे मंडप उभारण्यात येत असून तेथे भगवत गीता प्रदर्शन, स्लाईड शो, मेडिटेशन पार्क, गो सेवा स्टॉल, अध्यात्मिक पुस्तकांचे प्रदर्शन, युवकांना मार्गदर्शन करणारे स्टॉल राहणार आहेत. मंदिरास भेट देणाऱ्या सर्वांसाठी दोन्ही दिवस रात्री महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येत आहे. रथयात्रेच्या निमित्ताने अनेक कमिट्या नियुक्त करण्यात आले असून त्या सर्व कमिट्या जोमाने कामास लागल्या आहेत. पहिल्या दिवशी शनिवारी रथयात्रेनंतर श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमानंतर सायंकाळी 7 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत ज्येष्ठ भक्तांचे व्याख्यान होईल आणि महाप्रसादाचे वाटप केले जाईल. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सायंकाळी 4:30 ते 5:30 वाजेपर्यंत यज्ञ होईल. त्यानंतर 6:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत भजन, कीर्तन, प्रवचन आणि नाट्यलीला (अध्यात्मिक नाटक) असे कार्यक्रम होतील. या कार्यक्रमानंतर सर्वांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.

आजच्या पत्रकार परिषदेस आयोजक समितीचे अध्यक्ष बालकिशन भट्टड व ज्येष्ठ भक्त एच डी काटवा हेही उपस्थित होते. हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवाच्या सर्व कार्यक्रमात भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.