बेळगाव लाईव्ह : बेळगावसह संकेश्वर, अथणी, हुक्केरी आदी तालुक्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयातून हुबळी – धारवाड औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करण्याच्या हेतूने चिकोडी, गोकाक तालुक्यातील शेतजमिनीतून 80 किलोमीटर लांबीची जलवाहिनी घालण्यात आली असून यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या प्रकल्पामुळे बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.याविरोधात आज मारुती गल्ली येथील मारुती मंदिरात विविध संघ, संस्था, संघटना आणि समाजाच्यावतीने बैठक आयोजिण्यात आली होती.
कारंजीमठाचे श्री गुरुसिद्ध महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हॉटेल असोसिएशन , सहकारी पतसंस्था, शेतकरी संघटना, दलित संघटना, लिंगायत संघटना, माजी नगरसवेक संघटना, श्रीरामसेनेचे रमाकांत कोंडुस्कर, माजी आमदार शशिकांत नाईक, माजी आमदार रमेश कुडची, समाजसेवक सुजित मुळगुंद यांच्यासह ४० जणांची उपस्थिती होती.
हिडकलचे पाणी हुबळी धारवाड औद्योगिक वसाहतीला वळविण्याच्या सरकारच्या निर्णयाला यावेळी विरोध दर्शवत येत्या रविवारी यासंदर्भात व्यापक बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत सरकारच्या या निर्णयाविरोधात पुढील रूपरेषा ठरवून सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी बोलताना माजी आमदार रमेश कुडची म्हणाले, हिडकल जलाशयाचे पाणी हुबळी धारवाड औद्योगिक वसाहतीला वळविणे हे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे बेळगाववर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवणार आहे. ज्यावेळी हा निर्णय घेण्यात आला त्यावेळी या निर्णयाला बेळगाव महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी का विरोध दर्शविला नाही? बेळगावच्या जनतेच्या मतांवर निवडून आलेल्या नगरसेवकांनी केवळ आपल्या स्वार्थासाठी महानगरपालिकेत पद मिळविले आहे का? याविरोधात ठराव करून मनपा मध्ये का मांडण्यात आला नाही? असे सवाल उपस्थित करत हिडकल प्रश्नी सरकारने घेतलेल्या निर्णयावर नगरसेवकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.
उपस्थित मान्यवरांनी देखील हुबळीला हिडकलचे पाणी वळविण्याचा सरकारच्या निर्णयाला ठाम विरोध दर्शवत हिडकल ते हुबळी-धारवाडचे पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करण्यात यावे अशी मागणी केली. सरकारच्या या निर्णयाविरोधात सर्वसमावेशक आणि व्यापक लढा उभारण्यात येणार असून यामध्ये बेळगावकरांनी पक्ष, जात, भाषा असे सर्व भेदभाव बाजूला सारून प्रत्येकाने संघटितपणे सहभागी होण्यासाठी प्रत्येक समाजाच्या संस्था- संघटनांच्या नेत्यांच्या माध्यमातून एकजूट करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. दलित समाजाचे मल्लेश चौगुले, लिंगायत समाजाचे शंकर गुडस, मराठा समाजाचे रमाकांत कोंडुसकर यांच्यासह प्रत्येक संघ, संस्था, संघटनेच्या नेत्यांकडे जनतेला एकजूट करण्यासाठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या बैठकीला हॉटेल असोसिएशन , सहकारी पतसंस्था, शेतकरी संघटना, दलित संघटना, लिंगायत संघटना, माजी नगरसवेक संघटना, श्रीराम सेना, शशिकांत नाईक, रमेश कुडची यांच्यासह विविध संघ, संस्था, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.