बेळगाव लाईव्ह :राकसकोपकडे जाणाऱ्या हमरस्त्याला जोडल्या जाणाऱ्या लक्ष्मी टेकडी पाईपलाईन रोड येथे निर्माण झालेली रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्याची समस्या निकालात काढण्यासाठी भली मोठी चर खोदून समस्या आणखी वाढवल्यामुळे नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत असून तालुका आरोग्य अधिकारी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
कॅम्प येथील मिलिटरी हॉस्पिटल म्हणजे शौर्य चौकापासून राकसकोपच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याचे पेट्रोल पंप ते लक्ष्मी टेक दरम्यान दुपदरीकरण करण्यात आले आहे. मात्र या रस्त्याला दुतर्फा गटारींची सोय करण्यात आलेली नाही. परिणामी राकसकोपकडे जाणाऱ्या हमरस्त्याला जोडल्या जाणाऱ्या लक्ष्मी टेकडी पाईपलाईन रोड रस्त्याच्या ठिकाणी बुडा कॉलनी जवळ सांडपाणी रस्त्यावरून वाहण्याची आणि रस्त्याकडेला तुंबून राहण्याची समस्या उद्भवली आहे.
त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या या समस्येचे निवारण करण्याची सातत्याने मागणी केली जात आहे. अलीकडेच प्रसिद्धी माध्यमांनी या संदर्भात आवाज उठवताच रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी कार्यवाही करण्यात आली. मात्र ही कार्यवाही इतकी उर्फाटी करण्यात आली की सांडपाण्याची समस्या निकालात निघण्याऐवजी ती आणखी वाढली आहे.
या संदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांनी सांगितले की, गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी प्रसिद्धी माध्यमांच्या सहाय्याने राकसकोपकडे जाणाऱ्या हमरस्त्याला जोडल्या जाणाऱ्या लक्ष्मी टेकडी पाईपलाईन रोड रस्त्याच्या ठिकाणी निर्माण झालेल्या सांडपाण्याच्या समस्येला वाचा फोडण्यात आली होती. त्याची दखल प्रशासनाने घेतली असली तरी हा आजचे मरण उद्यावर ढकलण्याचा प्रकार आहे असे म्हणावे लागेल.
कारण रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्याचा शाश्वत निचरा करण्याची सोय करण्याऐवजी त्यांनी रस्त्या शेजारी भली मोठी चर खोदून त्यामध्ये सांडपाण्याचा साठा होईल अशी व्यवस्था केली आहे. मात्र आता ते साचलेले सांडपाणी पुन्हा रस्त्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. आपल्याला बालपणी शाळेतच सांडपाणी साचू देऊ नये. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढतो, दुर्गंधी पसरते, आरोग्य बिघडते वगैरे गोष्टी शिकवल्या जातात.
या गोष्टी रस्त्याशेजारी चर खोदून त्यात सांडपाणी साचण्याची व्यवस्था करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनी शिकल्या नाहीत का? की जाणून बुजून त्यांनाही समस्या निकालात काढायची नाही असा प्रश्न पडतो असे सांगून तरी वरिष्ठ अधिकाऱ्याने या रस्त्यावरील कचऱ्याची आणि सांडपाण्याची समस्या त्वरित निकालात काढावी.
जेणेकरून या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही. विशेष करून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन चर खोदून सांडपाणी साचवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगली समज द्यावी, अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते अनगोळकर यांनी केली.