बेळगाव लाईव्ह :रिसालदार गल्लीतील जुन्या महापालिका आणि सध्याच्या तहसीलदार कार्यालयाच्या गोदामाला अचानक आग लागण्याची घटना आज दुपारी घडली. त्यामुळे कार्यालय आवारात कांही काळ एकच धावपळ उडाली होती.
रिसालदार गल्ली येथील तहसीलदार कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या गोदामाला आज गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. बंद असलेल्या गोदामातून धुराचे लोट बाहेर येऊ लागल्याने आगीचा सदर प्रकार उघडकीस आला.
सदर प्रकाराची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे काम हाती घेतले. आग लागलेल्या गोदामाच्या खोलीत पाण्याची फवारणी करून अग्निशामक दलाच्या जवानांनी परिश्रमपूर्वक आग आटोक्यात आणली.
मात्र तोपर्यंत गोदामाच्या त्या खोलीतील सर्व साहित्य आणि कागदपत्रे जळून खाक झाली होती. कारण गोदामाच्या उघड्या असलेल्या दरवाज्यातून आतमध्ये धगधगणारी आग बाहेरून दिसत होती.
दरम्यान उशिरापर्यंत गोदामाला लागलेल्या आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. तसेच आगीमुळे कशाचे? आणि किती? नुकसान झाले हे देखील उशिरापर्यंत कळू शकले नाही. आगीचे वृत्त वाऱ्यासारखे रिसालदार गल्ली परिसरात पसरताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.