बेळगाव लाईव्ह :त्रस्त शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन, तसेच बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या बुडा काल शुक्रवारी झालेल्या बैठकीत दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या ठरलेल्या बळ्ळारी नाल्याच्या सिमेंटकरणाचा निर्णय घेण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच शेतकऱ्यांनी अभिनंदन केल आहे.
दरवर्षी पावसाळ्यात बळणारे नाल्याला पूर येऊन काठावरील शेकडो एकर शेती पाण्याखाली जाते. त्यामुळे दरवर्षी संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. बळ्ळारी नाला काठा लगतच्या सुमारे 5000 एकर सुपीक जमिनीवर पुराचा परिणाम होत असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून नाल्यातील जलपर्णी व गाळ काढला जावा. नाल्याचे सिमेंटीकरण व्हावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्यामुळे अलीकडच्या वर्षात यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे बळ्ळारी नाला विकासाची जोरदार मागणी केली होती.
या मागणीचा वडगाव, येळ्ळूर, अनगोळ, जुने बेळगाव वगैरे शिवारातील शेतकऱ्यांच्यावतीने शेतकरी नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली अन्य शेतकरी नेते नारायण सावंत, कीर्तीकुमार कुलकर्णी, अमोल देसाई, मनोहर हलगेकर यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत गेल्या पावसाळ्यात पालकमंत्री जानकीहोळी यांनी भर पावसात बळ्ळारी नाल्याला दिलेल्या भेटी प्रसंगी सदर नाल्याचा लवकरच निश्चितपणे विकास केला जाईल, असे ठाम आश्वासन दिले होते.
त्या आश्वासनाची पूर्तता करण्यास त्यांनी सुरुवात केली असून बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या काल झालेल्या बैठकीत नाल्याच्या सिमेंटीकरणाचा आणि त्यासाठीचा सर्वंकष प्रकल्प आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर आज रविवारी सकाळी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बळळारी नाल्याला भेट दिली. याप्रसंगी शेतकरी नेते कीर्तीकुमार कुलकर्णी, अमोल देसाई, मनोहर हलगेकर आदिंनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर पालकमंत्री जारकीहोळी यांनी नाल्याची पाहणी करून त्यांच्यासोबत असलेल्या सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे वगैरे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. यावेळी शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. उ
पलब्ध माहितीनुसार बळ्ळारी नाल्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. राज्य सरकारकडून निधी मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सर्वेक्षण केले जाणार आहे.
जिल्हा पालक मंत्र्याच्या आजच्या बळ्ळारी नाला पाहणी दौऱ्याप्रसंगी बेळगाव लाईव्हने उपस्थित असलेल्या शेतकरी नेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्यावेळी बोलताना शेतकरी नेते कीर्तीकुमार कुलकर्णी यांनी बळ्ळारी नाल्याची समस्या मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागल्याचे सांगितले. काल झालेल्या बुडाच्या बैठकीत बळ्ळारी नाल्याच्या विकासाचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासाठीचे सर्वेक्षण करून प्रकल्प अहवाल तयार करण्यास जी मंजुरी मिळाली आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या नाल्याच्या विकास कामाला सुरुवात होणार आहे सदर नाल्याच्या विकासासंदर्भात आम्ही जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता, ज्याला आता यश मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण काल झालेल्या बुडा बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयामुळे या नाल्याच्या विकासाचा मुहूर्त लागला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आता सदर विकासाचे काम शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सर्वेक्षण करून लवकरात लवकर हाती घेऊन व्यवस्थित पूर्ण करावे, एवढीच आमची विनंती आहे असे कुलकर्णी यांनी सांगितले.
शेतकरी नेते अमोल देसाई म्हणाले की, गेल्या तीन-चार दशकांपासून हा बळ्ळारी नाला शेतकऱ्यांसाठी जीवनमरणाचा प्रश्न बनला होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी आमचे सहकारी कीर्तीकुमार कुलकर्णी, मनोहर हलगेकर, शशिकांत पाटील वगैरेंनी पाठपुरावा सुरू ठेवल्यामुळे आज या नाल्याच्या विकास कामाला सुरुवात होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हे विकास काम व्यवस्थित व्हावे यासाठी आम्ही पाठपुरावा करणार असून त्यासाठी काल बैठक घेऊन बळ्ळारी नाला विकास समितीही स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष कीर्तीकुमार कुलकर्णी हे तर उपाध्यक्ष म्हणून वडगाव कृषी पत्तीनच्या संचालिका माधुरी बिर्जे या असणार आहेत.
त्याचप्रमाणे सेक्रेटरी मी स्वतः असणार असून उपसेक्रेटरी मनोहर हलगेकर आणि खजिनदार आनंद कणबरकर हे असतील. तसेच या विकास समितीचे कार्याध्यक्ष म्हणून आमचे नेते रमाकांत कोंडुसकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. समस्त शेतकरी आमच्या या समितीचे सभासद असतील. तेंव्हा आपण सर्वांनी एकजुटीने बळ्ळारी नाल्याचे विकास काम लवकरात लवकर हाती घेऊन पूर्ण केले जाईल यासाठी प्रयत्नशील राहू या, असे आवाहन देसाई यांनी केले.
शेतकरी नेते मनोहर हलगेकर यांनी बळळारी नाल्याची समस्या सोडविण्यासाठी सदर नाल्याचे येळ्ळूर रोडवरील ब्रिजपासून सुळेभावीपर्यंत काँक्रिटीकरण करावे या मागणीसाठी रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली वडगाव बळ्ळारी नाला बांधकाम कमिटीने मंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन सादर केले होते. त्या निवेदनाची दखल घेत नुकत्याच झालेल्या बुडाच्या बैठकीत सदर नाल्याच्या विकासासाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे सदर नाल्याचे बांधकाम पहिल्या टप्प्यात येळ्ळूर रस्त्यावरील पुलापासून कुडची पुलापर्यंत केले जाणार असल्याचे आश्वासन बुडाकडून देण्यात आले आहे अशी माहिती दिली. त्याचप्रमाणे या निर्णयाचे आम्ही 8-10 गावातील शेतकरी स्वागत करतो. तसेच नाल्याचे काम करून देत असल्याबद्दल मंत्री सतीशअण्णा जारकीहोळी आणि रमाकांतदादा कोंडुसकर त्यांचे आम्ही ऋणी आहोत, असे हलगेकर म्हणाले.