Wednesday, February 26, 2025

/

हिडकलचे पाणी वळवण्यावर माजी नगरसेवकांना आक्षेप

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव, संकेश्वर, अथणी, हुक्केरी आदी तालुक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयाचे हुबळीच्या दिशेने वळविले जात आहे. त्यामुळे भविष्यात हिडकल जलाशयावर अवलंबून असणाऱ्या शहरांना पाणीसमस्येला सामोरे जावे लागणार आहे, हा प्रयत्न तातडीने थांबवावा अन्यथा आंदोलन करण्याचा पवित्रा माजी नगरसेवकांनी घेतला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी कि, हिडकल जलाशयाचे पाणी हुबळी – धारवाड औद्योगिक क्षेत्राला अर्धा टी एम सी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणीपुरवठ्यासाठी 80 किलोमीटर लांबीची जलवाहिनी घातली जात आहे. त्यामुळे चिकोडी, गोकाक तालुक्यातील शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. तसेच बागलकोट आणि विजापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही याचा धोका आहे.

बेळगावला देखील या जलाशयातून पिण्यासाठी पाणी पुरवठा होतो. जर हिडकल जलाशयातील पाणी हुबळी – धारवाड औद्योगिक वसाहतीला वळविण्यात आले तर बेळगाव, हुक्केरी आणि संकेश्वर शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. शिवाय शेतीतील पाण्यासाठीही परिस्थिती गंभीर बनणार आहे. हा प्रकल्प तातडीने मागे घ्यावा अशी मागणी पुढे येत आहे.

गेल्या काही वर्षात पावसाने मारलेल्या दडीमुळे बेळगावकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. जर हिडकल जलाशयाचे पाणी हुबळी – धारवाड औद्योगिक वसाहतीला वळविण्यात आल्यास भविष्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या जलाशयातून बेळगाव शहराला दोन टीएमसी पाण्याचा पुरवठा होतो.

केवळ बेळगावच नाही तर संकेश्वर, गोकाकला देखील याच जलाशयातून पाणीपुरवठा होतो. एकीकडे २४ तास पाणी पुरवठा योजना योग्य पद्धतीने कार्यान्वित नसल्याने बेळगावकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशातच शहराच्या पाण्याचे व्यवस्थापन देखील कोलमडले दिसून येते. यामुळे आधी बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात यावे, त्यानंतरच जलाशयातून हुबळी – धारवाड ला पाणी पुरवठा करण्यासंदर्भात विचार करण्यात यावा अशी मागणी माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येणार आहे.

यासंदर्भात लवकरच माजी नगरसेवकांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असून शासनाच्या हुबळीच्या पाणी देण्याच्या भूमिकेला विरोध करण्यात येणार आहे. बेळगाव शहरातील माजी नगरसेवक आम्ही या संदर्भात एकमेकांच्या माध्यमातून  चर्चा करत असून हिडकलचे पाणी हुबळीला वळवण्याच्या भूमिकेवर गंभीर आहोत  आम्ही यासंदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन  याला विरोध करणार आहोत अशी माहिती माजी नगरसेवक रणजीत चव्हाण पाटील यांनी बेळगाव लाईव्ह शी बोलताना दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.