बेळगाव लाईव्ह : राज्यातील तालुका व जिल्हा पंचायतींच्या निवडणुका चार वर्षांच्या विलंबानंतर अखेर होण्याची शक्यता आहे. सरकारकडून निवडणुका आयोजित करण्यासाठी तयारी सुरू असून, मे महिन्यात निवडणुका घेण्याचे संकेत मिळत आहेत. बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील तालुका व जिल्हा पंचायतींच्या निवडणुका गेल्या चार वर्षांपासून रेंगाळल्या होत्या.
आता या निवडणुका घेण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या आरक्षण निश्चित करणे, भौगोलिक सीमा निर्धारण करणे, तसेच निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्मिती यांसारख्या महत्त्वाच्या बाबी जलद गतीने पूर्ण केल्या जात आहेत.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चार दिवसांपूर्वी निवडणुकीसाठी आम्ही पूर्ण तयारीत असल्याचे सांगितले होते. सरकार 29 जानेवारी रोजी न्यायालयासमोर आपली भूमिका मांडणार असून, त्यानंतर निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील.
मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. त्यानंतरचे अधिवेशन संपल्यानंतर एप्रिल महिन्यात निवडणुकीची घोषणा होऊन मे महिन्यात निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी काँग्रेस पक्षामध्ये यासंदर्भात चर्चा सुरू असून, न्यायालयाच्या मंजुरीनंतर निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. मार्च-एप्रिल दरम्यान परीक्षा झाल्यानंतर निवडणुका घेणे अधिक सोयीस्कर ठरेल, असा निर्णय सत्ताधारी पक्षाने घेतला आहे.
चार वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर तालुका व जिल्हा पंचायतींमध्ये नवीन प्रतिनिधी निवडले जाणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. न्यायालयाच्या निर्णयावर संपूर्ण प्रक्रिया अवलंबून आहे. राज्यात एकूण २३९ तालुका पंचायत आहेत, ज्यामध्ये ३९०३ जागांसाठी निवडणूक होणार आहे. जिल्हा पंचायतींच्या बाबतीत राज्यभर एकूण ३१ जिल्हा पंचायत असून, त्यामध्ये १०८३ जागांसाठी निवडणुका होणार आहेत.
सुमारे तीन कोटी मतदार या निवडणुकांमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावतील. सरकारकडून निवडणुकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असून, वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात निवडणुकांची घोषणा होऊन मे महिन्यात निवडणुका पार पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.