बेळगाव लाईव्ह :बेळगाव उत्तर परिक्षेत्राचे नूतन पोलीस महानिरीक्षक म्हणून 2007 चे आयपीएस अधिकारी डॉ. चेतनसिंह राठोड यांची नियुक्ती करण्यात आली असून आज बुधवारी सकाळी त्यांनी आपल्या अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली.
बेळगावच्या पोलीस मुख्यालयात बेळगाव उत्तरपरिक्षेत्राचे मावळते पोलीस महानिरीक्षक विकाशकुमार विकास यांच्याकडून नवे पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) डॉ. चेतनसिंह राठोड यांनी अधिकाराची सूत्रे हाती घेतली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रारंभी उपस्थित पत्रकार व समस्त जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यापूर्वी हावेरी जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून काम केले असल्यामुळे मला बेळगाव उत्तर परिक्षेत्राचा अनुभव आहे. त्या अनुभवाच्या सहाय्याने यापूर्वीच्या पोलीस महानिरीक्षकांनी जे चांगले कार्य केले आहे जे चांगले उपक्रम सुरू केले आहेत ते मी मी देखील यापुढे सुरू ठेवीन.
कायदा व सुव्यवस्था उत्तम ठेवण्याबरोबरच गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्याला माझे प्राधान्य राहील असे सांगून जनस्नेही अधिकारी म्हणून कार्यरत राहण्याचा माझा प्रयत्न राहील आणि त्यासाठी सर्वांनी मला सहकार्य करावे, असे नूतन आयजीपी डॉ. चेतनसिंह राठोड म्हणाले.
राज्यातील बऱ्याच आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांना राज्य सरकारने नवीन वर्षात बढतीची भेट दिली आहे. त्यापैकी कांही अधिकाऱ्यांची बढतीपर बदली केली आहे, तर कांही अधिकाऱ्यांना बढती देऊन जुन्याच ठिकाणी कायम ठेवले आहे. बेळगाव उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विकाशकुमार विकास यांची बढतीपर पश्चिम बेंगलोरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नूतन पोलीस महानिरीक्षक म्हणून 2007 चे आयपीएस अधिकारी डॉ. चेतनसिंह राठोड यांची नेमणूक करण्यात आली आहे.
बेळगावच्या तत्कालीन पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांची बढतीपर म्हैसूरच्या पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. भीमाशंकर गुळेद यांनाही बढती मिळाली असली तरी यापुढेही ते त्याच जागेवर कायम राहणार आहेत.