बेळगाव लाईव्ह : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पुढे ढकलण्यात आलेला काँग्रेस अधिवेशन सोहळा आणि जय भीम, जय बापू, जय संविधान रॅली’ आज बेळगावमध्ये पार पडली. महात्मा गांधी यांच्या काँग्रेस अधिवेशन अध्यक्षपदाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कर्नाटक काँग्रेसने मंगळवारी बेळगावमध्ये ‘जय भीम, जय बापू, जय संविधान’ रॅली काढली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी बोलताना एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, भाजप गेल्या अनेक वर्षांपासून संविधान कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. देशात संविधान नसते तर देशात अराजकता माजली असती. यामुळेच आजकाल लोकांना गांधी आठवतात. त्यांच्या कार्याबद्दल, त्याग आणि योगदानाबद्दल लोक त्यांचा आदर करतात. कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष अधिक प्रभावी ठरत आहे, आणि त्यात प्रियांका गांधी यांचा संघर्ष हिरीरीने चालू आहे.
राणी चन्नम्मा यांनी आपल्या काळात लढा दिला त्याचप्रमाणे आधुनिक काळात प्रियांका गांधी यांचा संघर्ष सुरु आहे. गांधी कुटुंबाने देशासाठी अत्यंत मोठे बलिदान दिले आहे, त्यांना मोदी, शाह व त्यांच्या समर्थकांकडून नेहमीच शिव्या दिल्या जातात. काँग्रेसने महात्मा गांधींच्या तत्त्वांचा अवलंब करून देशाच्या एकतेसाठी काम केले आहे. महात्मा गांधी यांनी एकदा म्हटलं होतं की, “जिवंत राहून देशासाठी लढा देणार आहे”, आणि त्यांच्या या विचारांना विरोधकांनी गोळी मारून संपवण्याचा प्रयत्न केला.
गांधी यांच्या मते, मोदी आणि शाह हे गोडसेच्या विचारांचे अनुयायी आहेत. भाजपने गांधी, नेहरू, पटेल, आंबेडकर यांच्या भांडणांच्या मुद्द्यांवर राजकारण केले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचे आजही उपेक्षेचे राजकारण सुरू आहे. संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसने मोठं योगदान दिलं आहे, जे भाजप आणि हिंदू महासभेच्या लोकांपासून विसरले गेले आहे. मोदी सरकार देशाच्या एकतेला धोका निर्माण करत आहे. काँग्रेसने बाबासाहेबांची प्रेरणा घेतलेली आहे आणि संविधानाच्या रक्षणासाठी ते सदैव तत्पर राहिले आहेत. भाजपच्या नेत्या शहा यांनी बाबासाहेबांचा अपमान केला आहे. काँग्रेसच्या कार्याने गरीब, शेतकरी आणि दलितांच्या हक्कासाठी लढा दिला आहे. मोदी आणि शहा यांच्या कृतींनी देशात फसवणूक व अन्याय वाढवला आहे. काँग्रेसने दलितांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि गरीबांसाठी जास्त काम केले आहे, आणि आगामी तालुका व जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, महात्मा गांधी कट्टर हिंदू होते आणि काँग्रेसचा गांधींच्या हिंदुत्वावर विश्वास आहे. गांधी नेहमी प्रभू रामाचे नाव घेत असत. नथुराम गोडसेने त्यांची हत्या केली तेव्हा गांधींनी हे राम म्हटले होते. भाजपने नेहमीच गांधींना हिंदुविरोधी म्हणून मांडले, पण ते 100 टक्के खोटे आहे. भाजप आणि आर एस एस यांची विचारधारा देश तोडणारी आहे. आरएसएसएस हे सरकारच्या हातचे बाहुले म्हणून काम करते.
गांधी, बाबासाहेब आणि संविधानाला त्यांचा विरोध आहे. संविधान हे समानता, स्वातंत्र्य, समाजवाद या साऱ्या गोष्टींचे मूळ आहे. देशातील विविधता, धर्म, जाती, भाषा या सर्वांमध्ये एकता आणण्याचे काम संविधानात आहे. गांधी-आंबेडकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. महात्मा गांधी यांची तत्वे, आदर्श अनुकरणीय आहेत. मात्र भाजप गांधी आणि आंबेडकर विरोधी आहेत, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. गांधी आणि आंबेडकरांच्या विचारांचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी मांडले.
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, गांधीजींचे निधन झाले असले तरी त्यांची मूल्ये अजूनही जिवंत आहेत. हा केवळ काँग्रेसचा कार्यक्रम नाही. राष्ट्रपिता आणि अहिंसा चळवळीचे नेतृत्व जगातील सर्व नेत्यांनी मान्य केले. यावेळी भाजपवर निशाणा साधत ते म्हणाले, गोडसे पक्ष काय बोलले ते आम्हाला ऐकायचे नाही. ज्यांना स्वातंत्र्य चळवळीची माहिती नाही. त्याग म्हणजे काय हे त्यांना माहीत नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केली.