बेळगाव लाईव्ह :स्मशानभूमीच्या देखभालीसाठी निधीची तरतूद असतानाही बेळगाव महापालिका अधिकारी मजगाव येथील हिंदू स्मशान भूमीकडे साफ दुर्लक्ष करत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
साध्या नळ कनेक्शनचीही सोय नसलेल्या या स्मशानभूमीची सध्या पार दुर्दशा झाली आहे. तेंव्हा विद्यमान कर्तव्यदक्ष आयुक्त शुभा बी. यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव शहरात कोट्यावधी रुपयांची विकास कामे करण्यात आली आहेत आणि अजूनही केली जात आहेत. मात्र दुसरीकडे बेळगाव महापालिकेच्या व्याप्ती येणाऱ्या मजगाव येथील हिंदू स्मशानभूमीची दुर्दशा ‘जैसे थे’ आहे.
आपल्या कार्यक्षेत्रातील स्मशानभूमींची चांगली देखभाल करणे ही प्रत्येक महापालिकेची जबाबदारी असते आणि त्यासाठी स्वतंत्र असा निधी देखील उपलब्ध केला जात असतो. तथापि याबाबतीत मजगाव येथील स्मशानभूमीकडे बेळगाव महापालिका अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
प्रत्येक स्मशानभूमीमध्ये सर्वप्रथम प्राधान्याने पाण्याची सोय असावी लागते. मजगाव येथील स्मशानात मात्र आजतागायत साध्या पाण्याच्या नळाची सोय करण्यात आलेली नाही. या ठिकाणी सिंटेक्सच्या टाकीची सोय करण्यात आली असली तरी बहुतांश वेळा ती कोरडीच असते. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो.
विशेष करून अंत्यसंस्काराप्रसंगी तसेच सोमवार व गुरुवारी स्मशानात रक्षाविसर्जन विधीप्रसंगी पाणी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची कुचंबना होत असते. याव्यतिरिक्त देखभाल नसल्यामुळे स्मशानात झाडेझुडपे आणि गवताचे रान कायम वाढलेले असते.
मजगाव हिंदू स्मशानभूमीच्या दुरावस्थेबद्दल महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकांमध्ये विरोधी गट आणि सत्ताधारी गट वारंवार आवाज उठवत असतो. मात्र महापालिका अधिकारी नेहमी कानाचे पडदे बंद ठेवून त्याकडे दुर्लक्ष करत असतात. असे जर होत असेल तर मजगाव स्मशानभूमीच्या देखभालीसाठी असणारा निधी नेमका जातो कुठे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच किमान स्थानिक नगरसेवकाने तरी या स्मशानभूमीत तात्काळ पाण्याची शाश्वत सोय करून तिच्या विकासाकडे गांभीर्याने लक्ष द्यावयास हवे, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. मजगाव येथील हिंदू स्मशान भूमी समोरच जैन धर्मीयांची स्मशानभूमी असून तिची अवस्था ही कांही वेगळी नाही. बेळगाव शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळून देखील या पद्धतीने शहरातील एखादी स्मशानभूमी अविकसित राहणे ही लोकप्रतिनिधी आणि महापालिकेसाठी लाजिरवाणी गोष्ट असून मजगाव स्मशानभूमीचा त्वरेने विकास केला जावा. किमान तुर्तास या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून तात्काळ पाण्याच्या नळाची सोय करण्यात यावी, अशी जोरदार मागणी मजगाववासियांकडून केली जात आहे.