बेळगाव लाईव्ह : वेंगुर्ला रोडवरील रस्त्याची झालेली वाताहत अखेर नागरिकांच्या आंदोलनामुळे सुधारणेच्या दिशेने मार्गी लागली असून या भागातील रस्त्यांच्या विकासकामाला प्रारंभ करण्यात आला.
मात्र आता बिस्कीट महादेव ते पाईपलाईन रोड दरम्यानच्या रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य उभारले आहे. रस्त्यांच्या दुतर्फा येणाऱ्या वाहनांना खड्ड्यातून मार्ग काढत कसरत करत वाहने चालविण्याची वेळ आली आहे.
बिस्कीट महादेव ते पाईपलाईन रोड दरम्यान लक्ष्मी टेकडी पर्यंतचा रस्ता हा छावणी परिषदेच्या हद्दीत येतो. मागील वर्षीपासून या ना त्या कारणाने या रस्त्याचे खोदकाम करण्यात आले असून तात्पुरती डागडुजी करण्यात आल्याने रस्ते उखडले गेले आहेत.
रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरले असून पावसाळ्यात देखील चिखलातून मार्ग काढण्याची वेळ या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांवर आली होती. बिस्कीट महादेव ते शौर्य चौक दरम्यानचा रस्ता निसर्गाच्या विविध छटांनी नटलेला आहे. या भागात असणाऱ्या वृक्षांमुळे या रस्त्याचे सौंदर्य देखील अप्रतिम आहे. मात्र रस्त्यांची उडालेली चाळण, शंभू जत्ती महादेव मंदिर परिसराच्या रस्त्यावर पसरलेला कचरा आणि सुरु असलेल्या विकासकामांमुळे करण्यात आलेले खोदकाम यामुळे या भागातील नैसर्गिक सौंदर्याला देखील बाधा पोहोचली आहे.
या मार्गावरून तुडये (ता. चंदगड) यासह बेळगुंदी, बिजगर्णी, बेनकनहळ्ळी, गणेशपूर आदी भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याचप्रमाणे चंदगड भागातून येणाऱ्या लाल एस.टी. देखील याच परिसरातून येतात. आधीच खड्डे आणि रस्त्याची उडालेली संपूर्ण चाळण आणि उडणारे धूळ यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.