बेळगाव लाईव्ह : सांगली येथे झालेल्या एका कार्यक्रमात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांच्यासमवेत विशेष बैठक घेतली. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना सीमाप्रश्नासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले. समितीचे नेते प्रकाश मरगाळे यांनी सीमालढ्याची सविस्तर माहिती दिली. तसेच, दिल्ली येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात सीमासंबंधित ठराव घेण्याचा आग्रह केला.
सांगलीत पार पडलेल्या या विशेष बैठकीत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर आपली भूमिका मांडली. दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सीमासंबंधित ठराव घेण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली.
23 डिसेंबर 2024 रोजी या संदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषदेला पत्र पाठविण्यात आले होते. गेली 68 वर्षे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न प्रलंबित आहे. महाराष्ट्र शासनाने 29 मार्च 2004 रोजी सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला होता, मात्र त्यालाही 20 वर्षे झाली आहेत. ईशान्य भारतातील राज्यांतील सीमावाद केंद्र सरकारने सोडवले आहेत, मात्र महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रलंबितच आहे.
वादग्रस्त सीमा भागातील 865 गावे, विशेषतः बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील मराठी भाषा व संस्कृतीवर गळचेपी होत आहे. गेल्या 35-40 वर्षांत या भागात दरवर्षी 11 साहित्य संमेलन आयोजित केली जात आहेत, ज्यात बाल साहित्य संमेलनाचाही समावेश आहे. मराठी भाषिकांना मातृभाषेपासून वंचित ठेवले जात आहे. 1959 साली दिल्लीतील साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा ठराव झाला होता.
आता दिल्लीतील संमेलनात “वादग्रस्त सीमा भाग महाराष्ट्रात सामील करण्यात यावा” असा ठराव मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. गेली 68 वर्षे 865 गावांतील 25-30 लाख मराठी भाषिक लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत. हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित ठेवणे म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे. खेडे घटक, भौगोलिक सलगता, सापेक्ष बहुभाषिकता व लोकेच्छा या तत्त्वांचा आधार घेऊन केंद्र शासनाने वादग्रस्त सीमा भाग तातडीने महाराष्ट्रात सामील करावा, अशी मागणी समितीच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे विभागाचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
सदर निवेदनाचा स्वीकार केल्यानंतर समिती शिष्टमंडळाशी बोलताना तारा भवाळकर यांनी, निवेदनात नमूद करण्यात आलेल्या मुद्द्यांविषयी अधिक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, यावर कमिटीसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेण्यासंदर्भात उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले. यावेळी प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी, महेश जुवेकर, सुनील आनंदाचे, मारुती मरगान्नाचे, देसाई आदी उपस्थित होते.