Wednesday, January 8, 2025

/

धर्म. छत्रपती संभाजी महाराज मूर्ती अनावरण सोहळा बेकायदशीर : जिल्हाधिकारी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : अनगोळ येथे उभारण्यात आलेले धर्मवीर संभाजी महाराज स्मारक आणि मूर्ती अनावरण सोहळ्याला जिल्हा प्रशासन, मनपा आणि पोलीस विभागाने परवानगी दिली नसतानाही रविवार दि. ५ जानेवारी रोजी मूर्ती अनावरण करण्यात आले. सदर अनावरण बेकायदेशीर असून लवकरच सर्व शिष्टाचार पाळून थाटामाटात सर्वांना विश्वासात घेऊन उद्घाटन आणि अनावरण सोहळा आयोजिण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले.

रविवारी अनगोळ येथील बहुचर्चित धर्मवीर संभाजी महाराज स्मारक आणि उद्घाटनाचा समारंभ श्रेयवादासाठी घाईगडबडीत उरकण्यात आला. तत्पूर्वी येथील स्थानिक नागरिकांनी उद्घाटन सोहळ्यावर आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी सदर सोहळा रद्द करण्याचे सूचित केले असतानाही राजकीय स्वार्थ ठेवून घिसाडघाईने कार्यक्रम उरकण्यात आला. यानंतर आज अनगोळ मधील नागरिकांनी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, सदर कार्यक्रमाला जिल्हा प्रशासन, मनपा किंवा पोलीस विभागाची परवानगी नव्हती. शिष्टाचार पाळून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनावरण आणि उद्घाटन सोहळा होणे गरजेचे आहे.

याप्रकरणी काही कालावधीपूर्वी मनपामध्ये ठराव संमत करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस आयुक्तांनी यासाठी परवानगी देत ना हरकत प्रमाणपत्र देखील दिले होते. पुढील कार्यवाहीसाठी सरकार दरबारी परवानगी साठी पत्र पाठविले. मात्र त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाहणी करून, त्यानंतर पाहणी अहवाल सादर करून परवानगी घेण्यात यावी आणि त्यानंतरच शिष्टाचार पाळून उद्घाटन करण्यात यावे, असे नमूद केले होते. मात्र काल झालेले उद्घाटन हे या कोणत्याही गोष्टी पाळून करण्यात आले नाही. त्यामुळे उद्घाटन आणि अनावरण हे बेकायदेशीर असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.Angol issue

ते पुढे म्हणाले, स्मारक आणि मूर्ती उदघाटनासाठी आपण पाहणी करणार आहोत. तसेच नियमानुसार मनपा ठराव, पोलीस आयुक्तांची परवानगी आणि ना हरकत प्रमाणपत्र घेऊन सरकारकडे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व नियम पाळून उद्घाटन समारंभासाठी परवानगीसाठी अर्ज सादर करणार आहोत. या उद्घाटन सोहळ्यात सर्वांना विश्वासात घेतले जाणार आहे. याचप्रमाणे सर्व राजकीय पक्ष, सर्व जातीधर्माच्या नागरिकांनादेखील समाविष्ट करून घेतले जाणार आहे, तसेच हा सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, रविवारी झालेला मूर्ती लोकार्पण सोहळ्याचे राजकारण्यांनी स्वार्थासाठी आणि श्रेयवादासाठी राजकारण केले. जिल्हा प्रशासनाचे आदेश डावलून मनमानी कारभार केला. स्मारकाचे कामकाज अद्याप अर्धवट स्थितीत आहेत. धवजस्तंभ, विद्युत रोषणाईची कामकाज बाकी आहे. असे असतानाही मूर्तीचे तडकाफडकी अनावरण करण्यात आले. प्रशासन, मनपा आणि पोलीस विभागाची परवानगी नसतानाही अनावरण करण्यात आले, यामुळे शिवशंभूप्रेमींची मने दुखावली गेली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी सर्वांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले होते.

यानुसार सर्वांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत घडल्या प्रकाराबाबत चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी आपण स्वतः जातीने यात लक्ष घालून उर्वरित कामे पूर्ण करून, नागरिकांची बैठक घेऊन, चर्चेअंती सर्वानुमते निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती यावेळी उपस्थित नागरिकांनी दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.