बेळगाव लाईव्ह : म्हैसूर येथूल मनपा प्रशासनाचे प्रशिक्षण पूर्ण करून चंदीगड येथे दाखल झालेल्या बेळगाव महानरगपालिकेच्या नगरसेवकांनी आज चंदीगड येथील महानगरपालिकेला तसेच स्मार्ट सिटी कार्यालयाला भेट दिली.
या दौऱ्यादरम्यान नगरसेवकांनी चंदीगडच्या महापालिका कारभाराचा आढावा घेत कचरा व्यवस्थापन, कचऱ्याची विल्हेवाट, दररोजचे कचरा व्यवस्थापन आणि स्मार्ट सिटीच्या कार्यप्रणालीबद्दल माहिती घेतली.
बेळगाव महापालिकेतील ५८ लोकनियुक्त नगरसेवक, ५ सरकारनियुक्त नगरसेवक आणि इतर अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्याला ४८ जण सामील झाले असून त्यामध्ये ४६ नगरसेवक आणि दोन अधिकारी आहेत. या दौऱ्यासाठी ३० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
अभ्यासदौऱ्यादरम्यान नगरसेवकांनी चंदीगडच्या महापौरांची भेट घेतली आणि सत्ताधारी तसेच विरोधी गटातील नगरसेवकांनी महापालिका प्रशासन तसेच स्मार्ट सिटीचे कामकाज याबाबत चर्चाही केली.
चंदीगड शहराच्या व्यवस्थापनाचे आणि स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचे कार्य कशापद्धतीने चालते याची माहिती घेण्यासाठी नगरसेवकांनी चंदीगड महापालिका आणि स्मार्ट सिटी कार्यालयाला भेट दिली. त्यांनी कचरा व्यवस्थापन, कचऱ्याची विल्हेवाट आणि शहराच्या पायाभूत सुविधांविषयी सखोल चर्चा केली.
या दौऱ्यानंतर महापौर-उपमहापौर निवडीच्या प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेळगावच्या विकासासाठी नगरसेवक चंदीगडच्या धर्तीवर कोणते उपाय राबवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.