बेळगाव लाईव्ह : गांधी भारत कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभरातील काँग्रेस नेते बेळगावात एकत्र येत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी माध्यमांसमोर विविध मुद्द्यांवर स्पष्टीकरण देत, स्थानिक राजकारण हे ‘डर्टी’ असल्याचे सांगत यावर आपण भाष्यच करणार नसल्याचे सांगितले. तसेच काँग्रेस पक्षामध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
बेळगावात माध्यमांशी सोमवारी सकाळी संवाद साधताना डीके शिवकुमार म्हणाले की, गांधी भारत कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील काँग्रेस नेते बेळगावात जमणार आहेत. या कार्यक्रमासाठी जवळपास साठ जण विविध भागांतून येत असून, बहुतांश आमदार, आमदार परिषद सदस्य उपस्थित राहणार आहेत. प्रियांका गांधी यांच्या दौर्याचे नियोजन पूर्ण झाल्याचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी जाहीर केले. जय भीम, जय गांधी, जय संविधान” हा कार्यक्रम महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना वंदन करत संविधान रक्षणासाठी आयोजित केला जात आहे. दिल्ली निवडणुकीसाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना जबाबदारी न दिल्याच्या मुद्द्यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, “सिद्धरामय्या सध्या अर्थसंकल्पाच्या तयारीत व्यस्त आहेत. या कारणामुळेच दिल्लीतील निवडणुकीची जबाबदारी इतरांना सोपवण्यात आली आहे.
काँग्रेस नेते रणदीप सुरजेवालांविरुद्धच्या कारवाईविषयी विचारलेल्या प्रश्नावर शिवकुमार यांनी माध्यमांसमोर तीव्र प्रतिक्रिया दिली. समाजमाध्यमे चुकीची माहिती पसरवत असून आमची प्रतिमा मलीन करत आहेत, अशा प्रकारे बातम्या देणे थांबवा, अशा कडक शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली.
यावेळी प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या स्थानिक राजकारणावरील प्रश्नांवर भाष्य करण्यास नकार देताना त्यांनी स्पष्ट केले की, आम्ही राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम आयोजित करत आहोत. काँग्रेसची ताकद किती आहे हे सिद्ध करण्यासाठी मोठ्या प्रयत्नांनी हा कार्यक्रम आखला आहे. कोणत्याही प्रकारचे मतभेद किंवा बंडखोरी आमच्यामध्ये नाही. येथील डर्टी राजकारणावर बोलण्यात मला रस नसल्याचे ते म्हणाले.
पक्षाचे महत्व अधोरेखित करत डीके शिवकुमार म्हणाले, सरकार टिकवणे ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. कोणत्याही प्रकारच्या मतभेदांना माझ्या नावाशी जोडू नका. माझ्यासाठी कार्यकर्ते, मंत्री, आमदार हे सर्व समान आहेत. काँग्रेससाठी मी सदैव कार्यरत राहणार आहे. पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. भविष्यातही मी पक्षासाठी आणि जनतेसाठी काम करत राहीन असे सांगत डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेसमध्ये कोणतेही अंतर्गत मतभेद नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री दाखल झाले बेळगावात
मंगळवारी होणाऱ्या सुवर्णसौध येथील महात्मा गांधीजींच्या पुतळा उद्घाटन कार्यक्रमात आणि काँग्रेसच्या सीपीएड मैदानावरील जय भीम जय बापू आणि जय संविधान या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामयया यांच्यासह विधानसभा अध्यक्ष यू टी खादर, मंत्री एच के पाटील, एम बी पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्य बेळगावत दाखल झाले आहेत. सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय आणि उपमुख्यमंत्री डेकोरेशो कुमार यांच्यासह सर्वांनी सुवर्ण सौध येधील पुतळा उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला आणि पाहणी केली.