बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील तंबाखू उत्पादने विक्री करणाऱ्या व्यापार्यांनी १५ फेब्रुवारीपूर्वी स्वतंत्र परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तंबाखू विक्रीसाठी स्वतंत्र परवाना घेण्याच्या प्रक्रियेबाबत शहर महानगरपालिकेने निर्देश दिले आहेत.
बेळगाव महानगरपालिकेने तंबाखू विक्रेत्यांसाठी स्वतंत्र परवान्याची अट घातली असून, ही प्रक्रिया केंद्र सरकारच्या २०२२ च्या अधिसूचनेनुसार राबवली जात आहे. या नियमांनुसार, तंबाखू विक्रीसाठी स्वतंत्र परवान्याची आवश्यकता आहे.
परवाना मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून १५ फेब्रुवारी ही अंतिम मुदत आहे. परवाना अर्जाचे शुल्क ५०० रुपये असून अर्ज महानगरपालिका कार्यालयात उपलब्ध आहे. अर्जासोबत महानगरपालिकेने जारी केलेला वैध व्यापार परवाना, अर्जदार व दुकानमालकाचे आधार कार्ड, दुकानाच्या जागेचे मालकी किंवा भाडे पट्टीचे प्रमाणपत्र, अर्जदाराचा अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
तंबाखू विक्रीसाठी स्वतंत्र परवाना अनिवार्य केल्याने तंबाखू विक्रीवर अधिक चांगले नियंत्रण ठेवता येईल आणि एकाच ठिकाणी तंबाखू व खाद्यपदार्थांच्या विक्रीला प्रतिबंध करता येईल. केंद्र सरकारच्या नियमांचे पालन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले.
जर कोणत्याही विक्रेत्याने १५ फेब्रुवारीपूर्वी परवाना घेतला नाही, तर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याशिवाय, तंबाखू विक्रीसाठी नवीन परवान्यासोबत वैध व्यापार परवाना असणे देखील अनिवार्य आहे, असेही कळविण्यात आले आहे.