बेळगाव लाईव्ह :आधीच उद्यम प्रमाणपत्र असलेल्या आस्थापनांसाठी महापालिकेकडून आता व्यापार परवाना सक्तीचा केला जाणार असल्याबद्दल बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स, बेळगाव क्लॉथ मर्चंट असोसिएशन, फार्मसी असोसिएशन, हॉटेल असोसिएशन आणि इतर संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. तथापी शहर आयुक्त शुभा बी. यांच्याशी नुकत्याच झालेल्या बैठकीत चेंबरने ऑफ कॉमर्सने 2020 मधील कायद्यातील दुरुस्ती उद्यम प्रमाणपत्र धारकांना स्वतंत्र व्यापार परवाना आवश्यकतेपासून सूट देते, असे ठळकपणे स्पष्ट केले आहे.
कायद्यातील 2020 च्या दुरुस्तीमध्ये असे म्हंटले आहे की, महापालिकेकडून वैध उद्यम प्रमाणपत्र असलेल्या व्यवसायांना व्यापार परवाना घेणे आवश्यक नाही. चेंबर ऑफ कॉमर्सने या दुरुस्तीची प्रत आयुक्त कार्यालयात सादर करण्याचे आश्वासन दिले आहे. आयुक्त शुभा यांनी ही दुरुस्ती मान्य केली असली तरी कागदपत्रांचा आढावा घेतल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागू शकतो.
तोवर महापालिकेकडून व्यापार परवाना सक्ती केली जाणार नाही असे त्यांनी सांगितले. सध्या बेळगाव महापालिकेकडून उद्यम प्रमाणपत्र धारकांसह सरसकट सर्व व्यवसायांसाठी व्यापार परवाना अनिवार्य केला जात आहे. महापालिकेच्या या भूमिकेमुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. तथापी त्यावर पुढील आठवड्यात ठोस निर्णय अपेक्षित असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.
व्यापार परवाना सक्ती हा भूतकाळात वादग्रस्त मुद्दा राहिला आहे. माजी उपायुक्त नितेश पाटील आणि पूर्वीच्या शहर आयुक्तांच्या कार्यकाळात उद्यम प्रमाणपत्र धारक व्यवसायांच्या बाबतीत व्यापारी परवान्याची आवश्यकता मागे घेण्यात आली होती. या उदाहरणाचा बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सने नुकत्याच झालेल्या बैठकीत पुनरुच्चार केला आणि सध्याच्या प्रशासनाला ती सूट कायम ठेवण्याची विनंती केली. उद्यम प्रमाणित व्यवसायांव्यतिरिक्त कांही विशिष्ट क्षेत्रे, जसे की फार्मास्युटिकल आस्थापने जी आधीच व्यापार परवाना आवश्यकतेपासून मुक्त आहेत.
हे लक्षात घेऊन व्यवसायांसाठी अस्पष्टता टाळण्यासाठी स्पष्ट निर्देश देण्याची विनंती बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सने केली आहे.
बैठकीदरम्यान, शाश्वत पद्धतींमध्ये व्यवसायांना संलग्न करण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकण्याच्या हेतूने चेंबरच्या सदस्यांना कचरा वर्गीकरण शिष्टाचाराबद्दल (प्रोटोकॉल) देखील माहिती देण्यात आली. बैठकीत बेळगावमधील व्यापारीवर्गाला आवश्यक ती स्पष्टता देऊन पुढील आठवड्यात महापालिकेचा अंतिम निर्णय कळविला जाईल, असे आश्वासन आयुक्त शुभा बी. यांनी दिले आहे.