बेळगाव लाईव्ह:नुकताच म्हैसूर येथे महापालिका प्रशासनाचे प्रशिक्षण घेऊन आलेले नगरसेवक आता चंदिगडला पाच दिवसांच्या अभ्यास दौर्याला जाणार आहेत. त्यासाठी 30 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. 27 जानेवारी रोजी नगरसेवक आणि अधिकारी चंदिगडला रवाना होणार आहेत.
नगरसेवकांना चंदिगड अभ्यास दौर्याबाबत 29 ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव संमत करण्यात आला होता. त्यानुसार महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी 7 जानेवारी रोजी नगर प्रशासन संचनालयाला पत्र लिहिले होते.या पत्राचे उत्तर आले असून नगर प्रशासनाने अभ्यास दौर्याला संमती दिली आहे. या दौर्यासाठी 30 लाख रुपये मंजूर केले आहेत.
नगर प्रशासन संचनालयाने पाठवलेल्या पत्रानुसार महापालिकेचे लोकनियुक्त 58 नगरसेवक, सरकारनियुक्त पाच आणि दोन अधिकारी किंवा कर्मचारी या दौर्यात सहभागी होवू शकतात. चंदिगड स्मार्ट सिटी आणि चंदिगड शहराचा विकास यावर अभ्यास दौरा असणार आहे. 30 लाख रुपये या दौर्यासाठीच खर्च करावे लागणार आहेत.
खर्चाच्या पावत्या लेखा विभागात जमा करून त्याचे ऑडिट करावे लागणार आहे. सरकारच्या प्रवाशी सेवेतून हा दौरा होणार आहे. या अभ्यास दौर्यात निर्धारीत नगरसेवक आणि अधिकार्यांनाच संमती असणार आहे. दुसरे कोणीही या दौर्यात सहभागी होवू शकत नाही.
चंदिगड वगळता इतर कोणत्याही स्थळाला भेट देता येणार नाही.
अभ्यास दौरा झाल्यानंतर या दौर्यातील अनुभव, तेथील विकास आणि इतर माहिती नगर प्रशासन संचनालयाकडे कळवणे, ती संकेतस्थळावर अपलोड करावी लागणार आहे. महापालिकेत लोकनियुक्त सभागृह येऊन दोन वर्षे होत आली आहेत. या काळात अनेकदा अभ्यास दौर्याचा विषय निघाला होता. अखेर यावेळी नगरसेवकांचा चंदिगड दौरा निश्चित झाला आहे.