बेळगाव लाईव्ह : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 17 जानेवारी 1956 रोजी झालेल्या आंदोलनात प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना आज शुक्रवारी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे अभिवादन करण्यात आले. समितीतर्फे हुतात्मा चौक, कंग्राळी खुर्द, खानापूर, निपाणीत समिती नेते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली.
हुतात्मा चौकात अभिवादन कार्यक्रम पार पडल्यानंतर रामदेव गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनसूरकर गल्ली आणि किर्लोस्कर रोडमार्गे मूकफेरी निघाली. त्यानंतर हुतात्मा चौकात अभिवादन सभा पार पडली.
यावेळी बोलताना माजी महापौर आणि म. ए. समिती सरचिटणीस मालोजी अष्टेकर म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे आजही सीमावासीयांना स्मरण आहे. १९६९ साली मुंबईत झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शिवसेनेच्या ७२ शिवसैनिकांचे हौतात्म्य, १ जून १९८६ साली झालेल्या कन्नड सक्ती आंदोलनातील हुतात्मे यासह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान दिलेल्या असंख्य हुतात्म्यांना आज अभिवादन करण्यात येत आहे. सीमाभागातील प्रत्येक सीमावासीय हुतात्म्यांचे आजही तितक्याच गांभीर्याने स्मरण करत असून सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले.
समिती नेते ऍड. राजाभाऊ पाटील बोलताना म्हणाले, केंद्र सरकारने सीमाभागावर अन्याय केला आहे. सीमाप्रश्नी जनतेच्या भावनांचा खेळ करण्यात आला आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला. मात्र संयुक्त महाराष्ट्र ऐवजी खंडित महाराष्ट्राची निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्र संपूर्णपणे उभा करण्यासाठी केवळ सीमावासियांच्या नाही तर महाराष्ट्रातील जनतेचा पाठिंबा मिळत आहे. या लढ्यात समितीच्या वतीने दिलेली बेळगावसह संपूर्ण सीमाभागाची घोषणा हि अपूर्णच राहिली, याचा खेद आहे. हि मागणी पूर्ण करून घेण्यासाठी आपला लढा सुरुच असून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी आज केवळ सीमाभागात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील चौथी पिढी असल्याचे ते म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हुतात्मा दिन अभिवादन कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व समिती नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह कोल्हापूर येथील आंदोलनासाठी रवाना झाले.